शिवशाही न्युज नेटवर्क
सेलु तालुक्यातील घोराड ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी आरक्षण सोडत शुक्रवारी दि .१२जुन रोजी ग्राम पंचायत कार्यालयात पार पडली. चिमुकली कु. माही महाकाळकर हिच्या हस्ते सोडत काढण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रफुल नंदनवार, ग्रामविकास अधिकारी डब्ल्यु. एम. वाटकर तसेच ग्राम महसुल अधिकारी कु. सलोनी कापकर उपस्थित होते.
सोडतीनुसार वॉर्ड क्रमांक १ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला, वॉर्ड क्रमांक २ मध्ये अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व सर्वसाधारण महिला, वॉर्ड क्रमांक ३ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण महिला, वॉर्ड क्रमांक ४ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण तसेच वॉर्ड क्रमांक ५ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला असे आरक्षण निश्चित करण्यात आले.
दरम्यान, आरक्षण जाहीर होताच घोराड येथील गणेश वामनराव खोपडे यांनी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी आक्षेप दाखल केला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शुन्य आरक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात आला असताना ग्रामपंचायतीसाठी चक्रानुक्रम पद्धती का वापरण्यात आली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
तसेच आरक्षण प्रक्रिया २०११ च्या जनगणना आकडेवारी व जुन्या मतदार यादीच्या आधारे करण्यात आल्याचे सांगत, नवीन मतदार यादीच्या आधारे निवडणूक होत असल्यास आरक्षणाचा फेरविचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी वर्धा यांना पाठविण्यात आली आहे.

