राजेश वरटकर
मुख्य संपादक
आषाढी एकादशी जवळ येत असल्याने वारकऱ्यांना विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाचे वेध लागले आहेत. यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री क्षेत्र घोराड येथुन दोन पायदळ दिंड्या पंढरपुरच्या दिशेने प्रस्थान करणार आहेत. विदर्भाच्या प्रतीपंढरीतुन निघणा-या या दिंड्यांना वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व असुन, वारीसाठी सर्व तयारी पुर्ण करण्यात आली आहे.
पहिली दिंडी २६ जुन रोजी तर दुसरी दिंडी २९ जुन रोजी मार्गस्थ होणार आहे. घोराड ते पंढरपुर हा पायदळ प्रवास करत वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघणार आहेत. दिंडीतील वारकऱ्यांसाठी निवास, भोजन, वैद्यकीय सेवा आणि इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.
केजाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, घोराड यांच्या वतीने ही पायदळ दिंडी आयोजित केली जाते. दिंडीत विविध गावांतील वारकरी सहभागी होणार असुन, अनेक वर्षांपासुन ही परंपरा अखंड सुरू आहे.
दिंडीचा मार्ग सेलु, पवनार, यवतमाळ, हिंगोली, परभणी आदी भागांतुन जाणार असुन, विविध ठिकाणी मुक्काम ठेवण्यात आले आहेत. अखेर २३ जुलै रोजी पंढरपुरात दाखल होऊन आषाढी वारीत सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असुन, विठ्ठल नामाच्या गजरात वारीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

