शिवशाही न्युज नेटवर्क
सोलापुर जिल्ह्यातील हातोज ता. बार्शी गावात एका सुशिक्षित कुटुंबावर काळाने घाला घातला. जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक योगेश बाळासाहेब पाटील (वय ४०) यांनी कथित आर्थिक तणावातुन प्रथम पत्नी व दोन मुलांना विष दिल्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.
या घटनेत पत्नी माधुरी योगेश पाटील (वय ३९), मुलगा अर्थव (वय ११) आणि धाकटा मुलगा शिवांश (वय ६) यांचा मृत्यु झाला. शुक्रवारी सकाळी दूधवाला घरी आल्यानंतर बराच वेळ प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांना संशय आला. दरवाजा उघडुन पाहिले असता घरातील चारही सदस्य मृतावस्थेत आढळुन आले.
पोलिसांना घटनास्थळी २८ पानी सुसाईड नोट मिळाली असुन त्यात शेअर बाजारातील मोठे नुकसान, मित्र-नातेवाईकांकडुन घेतलेले पैसे आणि वाढता आर्थिक ताण यांचा उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे. सुसाईड नोटमध्ये कोणालाही जबाबदार धरले नसल्याचेही पोलिस सुत्रांनी सांगितले.
या दुर्दैवी घटनेमुळे संपुर्ण बार्शी तालुक्यासह शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. योगेश पाटील हे शांत, अभ्यासु, निर्व्यसनी व विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय शिक्षक म्हणुन ओळखले जात होते.आर्थिक विवंचनेत टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे, घटनेचा अधिक तपास पोलिसांकडुन सुरू आहे.

