विकासाच्या नावाखाली नागरिकांना वेठीस? मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प; घोराडकडे जाणाऱ्या भाविकांसह विद्यार्थ्यांची गैरसोय
शिवशाही न्युज नेटवर्क
सेलु नगर पंचायतच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या भूमिगत पाईपलाईन टाकण्याच्या कामामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असुन नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बोरधरण येथुन शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी भुमिगत पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी मुख्य सिमेंट रस्त्याची मशीनने मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे.
शहरासाठी उभारण्यात आलेल्या जलकुंभाचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी पाईपलाईनच्या कामादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी नाल्यांचे खोदकाम सुरू करण्यात आले आहे. खोदकामातुन निघालेली माती रस्त्याच्या मध्यभागी टाकल्याने संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी जवळपास बंद झाला आहे. नियमानुसार एका बाजूचे काम पुर्ण करून दुसऱ्या बाजुचे काम करणे अपेक्षित असताना कंत्राटदाराने दोन्ही बाजुंनी एकाचवेळी खोदकाम सुरू केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
मेडिकल चौक ते श्री क्षेत्र घोराड हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो. अधिक मासानिमित्त “विदर्भाचे दुसरे पंढरपूर” म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र घोराड येथुन नागरिक, शालेय विद्यार्थी आणि दैनंदिन कामासाठी शहरात ये-जा करणाऱ्यांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र रस्त्यावर पडलेले मातीचे ढिगारे, खोदकाम आणि बंद झालेली वाहतुक यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप करत तातडीने कामाचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करावे, रस्ता पुर्ववत दुरुस्त करून वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी नागरिकांकडुन करण्यात आली आहे.

