ललीत सुपारे
वायगाव, प्रतिनिधी
वायगाव ते राळेगाव या महत्त्वाच्या मार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली असुन रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे, चिखल आणि उखडलेला डांबरी थर यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्याला सुरुवात होऊनही रस्ता चे काम पुर्ण न झाल्याने पहिल्या पावसात रस्त्याची दैना झाली असुन दलदल निर्माण झाल्याने दुचाकीस्वारांना चिखलातुन मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे दिसुन येत आहे.
या मार्गावरून दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी, शेतकरी तसेच एसटी बसची वाहतुक होते. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनांचे संतुलन बिघडत असुन अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः दुचाकीस्वार, विद्यार्थी आणि महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले असुन ठिक ठिकाणी खोदुन ठेवलेल्या रस्त्याची गंभीर हालत झाली मात्र प्रशासनाकडुन दुरुस्ती च्या नावावर दिरंगाई होत आहे. रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की, काही ठिकाणी डांबरी रस्त्याऐवजी चिखलाचा मार्ग असल्याचा भास होतो. खराब रस्त्यांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे, हा रोड आहे की मृत्यु चा महामार्ग?असा प्रश्न विचारला जात आहे, आता प्रशासनाने लक्ष दिले नाही तर आंदोलनाचा मार्ग निवडला जाईल अशी चर्चा सुरू झाली आहे.एखाद्याचा जिव गेल्यावर च प्रशासन जागे होणार का?असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात येत आहे, या विभागाचे आमदार आमच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी पुढाकार घेऊन आम्हाला न्याय मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार की नाही अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनाने तातडीने लक्ष घालुन वायगाव–राळेगाव रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. पावसाळा सुरू होण्यापुर्वीच रस्त्याची ही अवस्था असल्याने पुढील काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
“रस्ता की चिखलाची गंगा?” असा प्रश्न आता संतप्त नागरिक विचारत असुन प्रशासनाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

