१६ जुनला वर्ध्यात करणार शासनाच्या जी.आर.ची होळी; किसान अधिकार अभियानचे आंदोलन
शिवशाही न्युज नेटवर्क
वर्धा
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांची दिशाभुल करणारी व फसवी असल्याचा आरोप करत किसान अधिकार अभियान, वर्धा जिल्ह्याने सरकारविरोधात आक्रमक भुमिका घेतली आहे. अभियानाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत या कर्जमाफी योजनेचा तीव्र निषेध करणारा ठराव एकमताने मंजुर करण्यात आला.
याच पार्श्वभुमीवर मंगळवार, १६ जुन २०२६ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महात्मा गांधी पुतळा परिसरात शासनाच्या कर्जमाफी संदर्भातील जी.आर.ची प्रतीकात्मक होळी करून जाहीर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.
शासनाने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पुर्ण न करता कर्जमाफीच्या नावाखाली कठोर व अव्यवहार्य अटी-शर्ती लादल्याने हजारो शेतकरी लाभापासुन वंचित राहणार असल्याचा आरोप अभियानाने केला आहे. आर्थिक संकटांत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी शासनाने केवळ घोषणाबाजी केल्याचा संतापही बैठकीत व्यक्त करण्यात आला.
शेतकरीविरोधी धोरणांविरोधात आवाज उठविण्यासाठी सर्व शेतकरी, शेतमजुर, कामगार आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन किसान अधिकार अभियानच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, “शेतकरी एकजूट जिंदाबाद”, “शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध असो” आणि “फसवी कर्जमाफी योजना रद्द करा” अशा घोषणांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. त्यामुळे येत्या १६ जुन रोजी वर्ध्यातील आंदोलनाकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

