शिवशाही न्युज नेटवर्क
सेलु शहर व तालुक्यात स्मार्ट मीटर बसविण्याच्या हालचालींविरोधात नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असुन, “स्मार्ट मीटर नको, आधी सुरळीत वीजपुरवठा द्या” अशी एकमुखी मागणी पुढे आली आहे. वर्षानुवर्षे वीज समस्यांनी त्रस्त असलेल्या नागरिकांवर आता स्मार्ट मीटर लादण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी महावितरण प्रशासनाला थेट इशारा दिला आहे.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये वारंवार वीज खंडित होणे, तासन्तास अंधाराचे साम्राज्य, कमी-जास्त दाबाचा पुरवठा, जळणारे ट्रान्सफॉर्मर, जीर्ण वीजवाहिन्या आणि सततचे तांत्रिक बिघाड या समस्या आजही कायम आहेत. त्यामुळे शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. अशा परिस्थितीत मुलभुत सुविधा सुधारण्याऐवजी स्मार्ट मीटर बसविण्याची घाई का केली जात आहे, असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, जे प्रशासन अखंड आणि विश्वासार्ह वीजपुरवठा देण्यात अपयशी ठरत आहे, ते स्मार्ट मीटरच्या माध्यमातुन नेमका कोणता विकास साधणार आहे? वाढत्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय हा जनहिताचा नसुन ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकण्याचा प्रयत्न असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
स्मार्ट मीटरमुळे भविष्यात प्रीपेड वीजप्रणाली लागु होण्याची शक्यता व्यक्त केली जात असुन, आधीच महागाईच्या झळा सहन करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांवर आणखी आर्थिक ओझे टाकण्याचा कोणताही प्रयत्न खपवुन घेतला जाणार नसल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटर बसविणे सक्तीचे नसल्याचे स्पष्ट केले असतानाही सेलु तालुक्यात ही मोहीम आक्रमकपणे राबविण्याचा प्रयत्न होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. लोकांच्या इच्छेला व हरकतींना डावलुन कोणताही निर्णय लादण्याचा प्रयत्न लोकशाही मुल्यांना धरून नसल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
नागरिकांनी महावितरण प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, प्रथम वीजपुरवठ्याच्या मुलभुत समस्या सोडवा, जीर्ण यंत्रणा बदला, शेतकरी व ग्राहकांना दिलासा द्या आणि त्यानंतरच स्मार्ट मीटरचा विषय काढा. अन्यथा तालुकाभर तीव्र जनआंदोलन उभारले जाईल. या आंदोलनाची संपुर्ण जबाबदारी महावितरण प्रशासन व शासनावर राहील, असा इशारा देण्यात आला आहे.
“स्मार्ट मीटर हटवा, आधी वीजपुरवठा सुधारा”
सेलु तालुक्यात सध्या ही घोषणा नागरिकांच्या तोंडी असुन, स्मार्ट मीटरचा मुद्दा येत्या काळात मोठ्या जनआंदोलनाचे रूप धारण करण्याची चिन्हे दिसत आहेत. महावितरणने वेळीच जनभावना लक्षात घेतली नाही, तर तालुक्यातील रोष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

