; वर्ध्यात भव्य मोर्चाची घोषणा
सेलु तालुकास्तरीय आढावा बैठकीत संघटन विस्तारासह जनआंदोलनाचा निर्धार*
विशेष प्रतिनिधी
सेलु तालुका
शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक भुमिका घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने वर्धा येथे भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली. सेलु येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजी राज्यमंत्री अशोकभाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख राजुभाऊ खुपसरे होते.
बैठकीत तालुक्यातील संघटनात्मक बांधणी, पक्ष विस्तार, बुथनिहाय मजबुतीकरण आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. प्रत्येक मतदान केंद्रावर पक्षाची ताकद वाढविण्यासाठी बीएलए (बुथ लेव्हल एजंट) नियुक्तीची प्रक्रिया वेगाने राबविण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तालुकाभर रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे, शैक्षणिक साहित्य वाटप तसेच गरजू नागरिकांना मदत यांसारखे विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी धोरणावर पदाधिकाऱ्यांनी तीव्र टीका केली. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणुक होत असून अनेक पात्र शेतकरी लाभापासुन वंचित राहत असल्याचा आरोप करण्यात आला. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी तसेच जनतेच्या विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या काही दिवसांत वर्धा येथे शिवसेनेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.
बैठकीत काही महत्त्वाच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. प्रवीण साटोणे यांची उपतालुकाप्रमुख, अतुल जुनघरे यांची हमदापुर जिल्हा परिषद सर्कल प्रमुख तर विलास कुबडे यांची दहेगाव पंचायत समिती सर्कल प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी जिल्हा संघटक प्रमोद भोमले, वर्धा विधानसभा प्रमुख पंकज सत्यकार, माजी तालुकाप्रमुख प्रमोद पांडे, तालुकाप्रमुख अमर गुंधी, शहरप्रमुख पिंटु पराते, तालुका समन्वयक योगेश इखार, उपतालुकाप्रमुख अतुल काकडे, कार्यालय प्रमुख बालु भुरे यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, महिला आघाडी, युवा सेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्साहपुर्ण वातावरणात पार पडलेल्या या बैठकीमुळे सेलु तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संघटनात्मक कार्याला नवी ऊर्जा मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

