स्कुल बस वाहतुक सुरक्षा समितीची महत्त्वपुर्ण बैठक संपन्न
शिवशाही न्युज नेटवर्क
वर्धा
जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने स्कुल बस वाहतुक सुरक्षा समितीची महत्त्वपुर्ण बैठक पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मेंढे मॅडम, शिक्षण विभागाचे अधिकारी, वाहतुक असोसिएशनचे अध्यक्ष देवाभाऊ निखाडे तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या बसमध्ये आवश्यक सुरक्षा सुविधा उपलब्ध असणे आणि नियमांचे काटेकोर
पालन करणे अत्यावश्यक असल्याचे पोलीस अधीक्षक अग्रवाल यांनी स्पष्ट केले. प्रत्येक स्कुल बसमध्ये प्रथमोपचार पेटी, अग्निशामक यंत्र, सीसीटीव्ही कॅ मेरे, जीपीएस प्रणाली तसेच बसच्या आतील व बाहेरील प्रवेशद्वारांवर लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक यंत्रणा असणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
बस चालक व क्लिनर यांना अग्निशमनाचे प्रशिक्षण देणे, त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करणे तसेच ते व्यसनमुक्त आणि चांगल्या चारित्र्याचे असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमुद केले. वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये, तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल. अशा प्रकरणांमध्ये वाहनाचा परवाना व परमिट निलंबित करण्याची कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
विद्यार्थी वाहतुकीसाठी ऑटो रिक्षा व ई-रिक्षाचा वापर करण्यास परवानगी नसल्याचे स्पष्ट करत विद्यार्थ्यांची सुरक्षा हीच प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. प्रत्येक स्कुल बसमध्ये तक्रार पेटी तसेच पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112 प्रदर्शित करणे अनिवार्य राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी आरटीओ विभाग आणि वाहतुक पोलीस संयुक्तपणे वेळोवेळी स्कुल बसची तपासणी करतील, असे सांगण्यात आले. बसची वेगमर्यादा नियंत्रित ठेवणे, अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविणे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड न करणे, याबाबत शाळा प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक अग्रवाल यांनी केले.
बैठकीत शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

