कपाशी वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव; १२ ऑक्टोबरला वर्धेत एकत्र येण्याचे आवाहन
सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे मिलिंद हिवलेकर यांचे आवाहन
राजेश वरटकर
मुख्य संपादक
शिवशाही न्युज नेटवर्क
वर्धा : बोरधरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या सेलु तालुक्यातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कपाशीचे पीक वाचविण्यासाठी बोरधरणाचे पाणी १५ नोव्हेंबरपर्यंत कालव्याद्वारे सुरू ठेवावे, अशी मागणी केळझर परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
यासंदर्भात गुरुवार, १ ऑक्टोबर रोजी केळझर येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी तसेच वर्धा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन कपाशी पिकासाठी पाणी सोडण्याची विनंती केली होती. त्यानंतर शुक्रवार, २ ऑक्टोबर रोजी बोरधरणाचे पाणी कपाशीसाठी सोडण्यात आले. सध्या पाणी रेल्वे लाईनपर्यंत पोहोचले असले, तरी कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत अद्याप पाणी पोहोचलेले नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
१५ नोव्हेंबरपर्यंत पाणी सुरू ठेवण्याची मागणी
कपाशी पिकाला आवश्यक असलेल्या पाण्याची गरज लक्षात घेता, १५ नोव्हेंबरपर्यंत कालव्यात पाणी सुरू ठेवणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. इतर आवश्यक पाणीसाठा राखुनही शेतकऱ्यांच्या हक्काचे सिंचनाचे पाणी उपलब्ध राहु शकते, असा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान, बोरधरणाचे पाणी बंद करण्यात येणार असल्याची माहिती समोर आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. कपाशीचे पीक संकटात येऊ नये आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे, यासाठी प्रशासनाकडे पुन्हा सामुहिक मागणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर उपस्थित राहण्याचे आवाहन
सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सेलू तालुक्यातील तसेच बोरधरणाच्या पाण्यावर अवलंबुन असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहुन जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करावी, असे आवाहन मिलिंद हिवलेकर व केळझर परिसरातील शेतकऱ्यांनी केले आहे.
कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने सिंचनाच्या पाण्याबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

