आंतरराष्ट्रीय योग दिन विशेष
राजेश वरटकर
मुख्य संपादक
जगभरात आज ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा होत असताना, निरोगी शरीर, शांत मन आणि सकारात्मक जीवनशैलीसाठी योगाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. आधुनिक धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नसुन, शरीर, मन आणि आत्म्याला जोडणारा संतुलित जीवनाचा खरा मंत्र ठरत आहे.
तज्ज्ञांच्या मते, नियमित योगाभ्यास आणि प्राणायामामुळे शरीरातील तणाव वाढविणारे ‘कॉर्टिसॉल’ हे संप्रेरक नियंत्रणात राहते. त्यामुळे मानसिक तणाव, चिंता आणि नैराश्य कमी होऊन मन शांत आणि स्थिर राहते. योगामुळे गाढ झोप लागण्यास मदत होत असून मानसिक आरोग्यही सुधारते.
योगासनांमुळे शरीराची लवचिकता वाढते आणि स्नायु मजबूत होतात. ताडासन, भुजंगासन, अधोमुख श्वानासन, नौकासन आणि वीरभद्रासन यांसारख्या आसनांमुळे शरीराचा समतोल, ताकद आणि कार्यक्षमता वाढते. तसेच नियमित योगामुळे रक्ताभिसरण सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
विद्यार्थ्यांसाठी योग एकाग्रता वाढविण्यास मदत करतो, तर नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी तणावमुक्त जीवन जगण्याचा प्रभावी मार्ग ठरतो. सकाळची सुरुवात योगाने केल्यास दिवसभर सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह कायम राहील. “योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसुन जीवन जगण्याची एक परिपुंर्ण कला आहे. निरोगी शरीर आणि शांत मनाच्या समतोलातुनच खऱ्या आनंदाची आणि समाधानाची प्राप्ती होते.”
आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहात योगसाधना करून निरोगी जीवनाचा संकल्प केला.
‘करू योग, राहू निरोग’ हा संदेश देत यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिन आरोग्य, संतुलन आणि सकारात्मक जीवनशैलीचा नवा संकल्प घेऊन साजरा करण्यात आला.

