करबलाची घटना आजही जगासाठी प्रेरणादायी
मोहरम निमित्त विशेष लेख
इस्लामी दिनदर्शिकेतील पहिला महिना असलेल्या मोहरमचे आगमन होताच कर्बलाच्या शौर्य, त्याग आणि सत्यनिष्ठेची आठवण जागी होते. हजरत इमाम हुसेन अलैहिस्सलाम यांनी आपल्या जीवनातुन ईमान, वफा, प्रेम, सत्य, संकल्प, समर्पण, न्याय आणि धर्माचे जे धडे दिले, ते आजही संपुर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहेत.
मोहर्रम हा केवळ नववर्षाचा प्रारंभ नसुन सत्यासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाची आठवण करून देणारा महिना आहे. इ.स. 680 मध्ये इराकमधील कर्बला येथे घडलेली घटना इतिहासातील एक महत्त्वपुर्ण अध्याय मानली जाते. पैगंबर मोहम्मद यांच्या नातु असलेल्या इमाम हुसेन यांनी अन्यायकारी सत्तेसमोर शरणागती पत्करण्याऐवजी सत्य आणि न्यायाच्या मार्गावर राहणे पसंत केले.
कर्बलाची भुमी ही केवळ एक रणांगण नव्हती, तर मानवी मुल्यांची परीक्षा घेणारी जागा होती. एका बाजुला अत्याचार, अन्याय आणि सत्तेचा अहंकार होता, तर दुसऱ्या बाजुला सत्य, नैतिकता आणि धर्मनिष्ठा होती. या संघर्षात इमाम हुसेन यांनी आपल्या कुटुंबीयांसह आणि सहकाऱ्यांसह अपार हालअपेष्टा सहन केल्या, मात्र अन्यायापुढे झुकले नाहीत.
कर्बलामध्ये अनेक दिवस पाण्याचा पुरवठा बंद करण्यात आला होता. तहानलेल्या लहान मुलांपासुन महिलांपर्यंत सर्वांनी संकटांचा सामना केला. तरीही इमाम हुसेन यांनी आपल्या तत्त्वांशी तडजोड केली नाही. न्याय जिवंत राहावा म्हणुन त्यांनी स्वतःचे आणि आपल्या परिवाराचे बलिदान दिले.
इतिहासात नोंद आहे की, कर्बलाच्या रणांगणात इमाम हुसेन यांचे सहकारी एकामागुन एक शहीद होत गेले. त्यांच्या सहा महिन्यांच्या अली असगर या बालकालाही पाण्याच्या मागणीदरम्यान शहीद करण्यात आले. त्यांचे तरुण पुत्र अली अकबर, भाऊ अब्बास आणि इतर अनेक नातेवाईकांनीही बलिदान दिले. या घटना मानवतेच्या इतिहासातील सर्वात वेदनादायी आणि हृदयस्पर्शी प्रसंग मानल्या जातात.
करबलाच्या बलिदानाचा संदेश केवळ मुस्लिम समाजापुरता मर्यादित नाही. सत्य, न्याय, मानवता आणि अत्याचाराविरोधातील संघर्षाचा हा संदेश सर्व धर्म आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. म्हणुनच जगभरातील विविध धर्मांचे अभ्यासक आणि विचारवंत इमाम हुसेन यांच्या त्यागाचा गौरव करतात.
मोहर्रमच्या दिवसांत विविध धार्मिक कार्यक्रम, मजलीस, प्रवचने आणि शोकसभांद्वारे कर्बलाच्या शहीदांचे स्मरण केले जाते. समाजात बंधुता, शांतता आणि मानवतेची भावना दृढ करण्याचा प्रयत्न या माध्यमातुन केला जातो.
आजच्या काळातही अन्याय, भ्रष्टाचार आणि दडपशाहीविरोधात उभे राहण्याची प्रेरणा कर्बलाच्या इतिहासातुन मिळते. सत्यासाठी संघर्ष करणे, संकटांना धैर्याने सामोरे जाणे आणि मानवी मूल्यांचे रक्षण करणे हा कर्बलाचा खरा संदेश आहे. त्यामुळे इमाम हुसेन यांचे बलिदान हे केवळ धार्मिक इतिहासाचा भाग नसुन संपुर्ण मानवजातीसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ ठरले आहे.
“प्रत्येक दिवस आशुरा आहे आणि प्रत्येक भुमी करबला आहे”, हा संदेश आजही अन्यायाविरोधात लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देत आहे. मोहर्रमचा महिना मानवतेला सत्य, न्याय, त्याग आणि समर्पणाची आठवण करून देत राहतो, हेच कर्बलाच्या शहीदांचे सर्वात मोठे योगदान मानले जाते.

