तालुका प्रतिनिधी
वरोरा
तालुक्यातील खांबाडा येथे मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसादरम्यान वीज कोसळुन १९ वर्षीय युवा कबड्डीपटुचा दुर्दैवी मृत्यु झाला. या घटनेमुळे संपुर्ण गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धीरज वाल्मीक जोगे (वय १९) हा युवक आपल्या आई व काकांसोबत शेतात काम करत होता. सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक वादळी पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी धाव घेत असताना अचानक धीरजच्या अंगावर वीज कोसळली.
या भीषण घटनेत तो गंभीर जखमी झाला. गावकऱ्यांनी तातडीने त्याला वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
धीरज जोगे हा गावातील होतकरू आणि गुणी कबड्डीपटु म्हणुन ओळखला जात होता. क्रीडा क्षेत्रात त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याच्या आकस्मिक निधनाने गावावर शोककळा पसरली असुन, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
शेतात काम करताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे जोगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असुन, संपुर्ण परिसरातुन धीरजला भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

