शिवशाही न्युज नेटवर्क
सेलु
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासुन सेलु शहर,घोराड, हिंगणी व परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हलकेसे वादळ किंवा पाऊसाची चाहुल लागताच विज वितरण ची बत्ती गुल होते. दिवसा आणि रात्री अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने घरगुती कामे, व्यावसायिक व्यवहार तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्याच्या सुरुवातीपासुनच वीजपुरवठ्याचा लपंडाव सुरू असुन तासन्तास वीज गायब राहत आहे. ग्रामीण भागातील विजपुरवठा खंडित होणे ही नित्याचीच बाब असुन आता याचा त्रास सेलु शहर तसेच घोराड, हिंगणी,केळझर या मोठ्या लोकसंख्येच्या गावातील लोकांना सहन करावा लागत असुन येथील अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी हजर राहत नसल्याने तक्रार करावी तरी कोणाकडे असा प्रश्न उपस्थित होतो.अधिकारी फोन बंद करून ठेवत असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.सोमवार व मंगळवारी तर घोराड येथील विज चार तासांपेक्षा जास्त वेळ बंद होती मात्र एकही अधीकारी फोन उचलत नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला,या बाबत शिवशाही न्युज कडे अनेकांनी फोन करून कैफियत मांडली असता शिवशाही न्युज नेटवर्क चे संपादक राजेश वरटकर यांनी वर्धा येथील कार्यकारी अभियंता नरेश पारधी यांना याबाबत माहिती दिली असता त्यांनी सहकार्याची भावना दाखवुन कर्मचा-यांना विज पुरवठा जो पर्यंत सुरळीत होत नाही तोपर्यंत कुठेही जाऊ नये व तात्काळ तांत्रिक अडचणी दुर करण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली, तसेच घोराड येथे दोन महीला लाईनमन असल्याने एका लाईनमन वर १० हजार लोकसंख्या असलेल्या गावाचा भार कमी करण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी केली,असता कार्यकारी अभियंता यांनी लगेच यांवर विचार करणार असल्याचे सांगितले. सध्या पावसाळा सुरू असुन वारंवार खंडित होणारा विज पुरवठा तसेच वातावरणातील उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असुन या बाबत महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
वारंवार होणाऱ्या वीज खंडितामुळे शेतकरी, लघुउद्योजक आणि सामान्य नागरिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, दैनंदिन कामकाज आणि लहान व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
नागरिकांनी महावितरण प्रशासनाने तातडीने दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, दोषी यंत्रणांची दुरुस्ती करावी आणि वारंवार होणाऱ्या खंडित पुरवठ्याला आळा घालावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

