शिवशाही न्युज नेटवर्क
सेलु
तालुक्यातील जामणी येथील पारधी बेडा परिसरात अवैध दारू निर्मितीवर अंकुश ठेवण्यासाठी सेलु पोलिसांनी गुरुवारी ‘वॉश आऊट’ मोहीम राबवत मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल ९ लाख ६७ हजार रुपयांचा अवैध दारूभट्टीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला.
पोलीस स्टेशन सेलुच्या पथकाने तीन अधिकारी, १६पोलीस कर्मचारी आणि १० होमगार्ड जवानांच्या मदतीने ही विशेष मोहीम हाती घेतली. छापेमारीदरम्यान अवैध दारू निर्मितीचे साहित्य, रसायने आणि इतर सामग्री जप्त करण्यात आली.
या प्रकरणी अदिनी काळे आणि रुपेश भोसले, दोघेही रा. पारधी बेडा, जामणी, ता. सेलु यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत. या धडक कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असुन परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सेलु पोलीस ठाण्याचे ठाणेदार पंकज वाघोडे, पोउपनि मढुमाळी, धनंजय पांडे तसेच पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड जवानांनी सक्रिय सहभाग घेतला.
अवैध दारू व्यवसायाविरोधात पुढील काळातही अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा सेलु पोलिसांनी दिला आहे.

