शिवशाही न्युज नेटवर्क
विदर्भातील दुसरे पंढरपुर म्हणुन ओळख असलेल्या श्रीक्षेत्र घोराड येथे मोहरम निमित्त दि.२८ जुन रविवारी श्री बापुअय्या कावडे महाराज संस्थान आखाड्यात भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी बापुअय्या चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य जय्यत तयारी करत असुन परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्रीक्षेत्र घोराड येथील बापुअय्या कावडे महाराज संस्थान (आखाडा )हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असुन विशेषतः मोहरम काळात या आखाड्याला धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त असुन सर्व धर्म समभावाचे प्रतिक आहे. मोहरम काळात अनेकांचे गंभीर प्रश्न सुटल्याचे भाविक सांगतात.यामुळे येथे मोहरम मध्ये बाहेर गावावरून येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते.श्री संत केजाजी महाराज यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या या संतनगरीत अनेक देवी-देवतांची मंदिरे असुन, श्री विठोबा महाराज यांनी या संस्थानची (आखाडा )स्थापना केली असल्याची माहिती आहे.
मोहरम निमित्त दरवर्षी या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. यावर्षीही हजारो भाविकांच्या उपस्थितीची अपेक्षा असुन, रविवारी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बापुअय्या कावडे महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
मोहरम निमित्त श्रद्धा आणि भक्तीचा संगम
सर्व धर्म समभावाचे प्रतिक असलेल्या बापुअय्या कावडे महाराज संस्थान घोराड येथे (आखाड्यात) १० हजार भाविकांची गर्दी अपेक्षित आहे.

