सावंगी रुग्णालयातील धक्कादायक प्रकाराने संतापाची लाट
शिवशाही न्युज नेटवर्क
वर्धा
रुग्णालयात मृत्युशी झुंज देणाऱ्या एका चिमुकल्याच्या जीवावर काही रुग्णवाहिका चालकांनी नफेखोरीचा बाजार मांडल्याचा संतापजनक प्रकार सावंगी मेघे येथील रुग्णालयात उघडकीस आला आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या एका गरीब पित्याकडुन हजारो रुपये उकळल्याची घटना समोर आल्यानंतर रुग्णसेवा की क्रुर धंदा, असा सवाल उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ येथील एका गरीब व्यक्तीच्या लहान बाळाची प्रकृती गंभीर होती. त्याला तातडीने ऑक्सिजनसह यवतमाळ येथे हलविण्याची गरज होती. मात्र, रुग्णवाहिका चालकाने या सेवेसाठी तब्बल तीन हजार रुपये भाड्याची मागणी केली. आधीच आर्थिक संकटात असलेल्या त्या पित्याला एवढी रक्कम देणे शक्य नसल्याने तो हताश झाला.
यावेळी उपस्थित असलेल्या एका संवेदनशील रुग्णवाहिका चालकाने संबंधित चालकाला गरीब कुटुंबाला मदत करण्याची विनंती केली. मात्र, त्यावर संबंधित चालकाने, “आम्ही सेवा करायला बसलो नाही, आम्ही धंदा करतो,” असे उत्तर दिल्याने उपस्थितांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, बाळाला यवतमाळ येथे नेल्यानंतर तेथील रुग्णालयात जागा उपलब्ध न झाल्याने त्याला पुढे नागपुरला हलवावे लागले. यावेळी आधीचे पैसे घेतलेले असतानाही संबंधित चालकाने पुन्हा पाच हजार रुपये घेतल्याची माहिती समोर आली आहे. एका अगतिक पित्याच्या असहायतेचा फायदा घेत आर्थिक पिळवणुक करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
सेवेचा दुसरा चेहरा
याच क्षेत्रात काही सेवाभावी रुग्णवाहिका चालक आजही ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर काम करत असल्याचे या घटनेतुन समोर आले आहे. अनेक चालक अत्यल्प दरात गरजु रुग्णांना सेवा देत असुन, गरिबांच्या मदतीसाठी स्वतः पुढाकार घेत असल्याचेही सांगण्यात आले.
प्रशासनाच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह
रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची आर्थिक व मानसिक अवस्था बिकट असताना काही रुग्णवाहिका चालकांकडुन होत असलेल्या या कथित लुटीवर प्रशासनाचे नियंत्रण का नाही, असा संतप्त सवाल जनतेतुन उपस्थित होत आहे. अशा प्रवृत्तींमुळे संपुर्ण रुग्णवाहिका क्षेत्राची प्रतिमा मलिन होत असुन, या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

