सेलु तालुक्यातील श्री क्षेत्र घोराड येथे आज मोहरमच्या दंगलीचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच निसर्गानेही दमदार हजेरी लावत मुसळधार पावसाची दंगल केली. सुमारे एक तास झालेल्या जोरदार पावसाने संपुर्ण परिसर चिंब भिजला असुन यावर्षीच्या पावसाळ्यातील पहिल्या समाधानकारक पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकरी चिंतेत होते. आद्रा नक्षत्रावर भिस्त ठेवुन काही शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली होती, तर पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने अनेकांनी पेरणी थांबवुन धरली होती. गेल्या तीन दिवसांपासुन वर्धा शहरात पाऊस पडत असताना सेलू-घोराड परिसराला मात्र पावसाने हुलकावणी दिली होती.
दरम्यान, आज श्री क्षेत्र घोराड येथुन पंढरपुरकडे पायदळ वारी प्रस्थान करणार असल्याने “आज पाऊस हमखास पडणार” असा अंदाज वृद्ध जाणकार व्यक्त करत होते. दुपारी चार वाजता श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरातुन श्री संत केजाजी महाराज पालखी सोहळा मंदिर परिकोटाला प्रदक्षिणा घालुन पंढरपुर वारीसाठी मार्गस्थ झाला.
याचवेळी मंदिर परिसरात मोहरमनिमित्त वाजत-गाजत दंगल सुरू असतानाच मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. भरपावसात दिंडीतील वारकरी, मोहरमची दंगल पाहण्यासाठी आलेले भाविक आणि तरुण वर्ग अक्षरशः ओलेचिंब झाला. “श्री संत केजाजी महाराज की जय” आणि “बापुअय्या कावडे महाराज की जय”च्या घोषणांनी संपुर्ण परिसर दुमदुमुन गेला. तरुणांनी पहिल्या दमदार पावसाचे जल्लोषात स्वागत करत आनंदाने नृत्य केले.
या समाधानकारक पावसामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला असुन नागरिकांनाही उकाड्यापासुन मोठा दिलासा मिळाला आहे. पहिल्याच मुसळधार पावसामुळे घोराड परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.मात्र याच वेळी वर्धा शहर परिसरात एकही थेंब पाऊस आला नसल्याचे सांगण्यात आले.

