राजेश वरटकर
मुख्य संपादक
विदर्भाचे पंढरपुर म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र घोराड येथुन आषाढी एकादशी निमित्ताने निघणारी श्री संत केजाजी महाराज पायदळ वारी दिंडी मोठ्या भक्तिमय वातावरणात पंढरपुरकडे मार्गस्थ झाली. सन २०१६ पासुन सुरू झालेली ही परंपरा यावर्षी अकराव्या वर्षात पदार्पण करत आहे. मात्र, कोरोना काळात शासनाच्या नियमांमुळे सलग दोन वर्षे या दिंडीला खंड पडला होता.
या पायदळ वारीला प्रारंभ करण्यामागे ह.भ.प. हरिदास महाराज महाकाळकर यांचा मोलाचा पुढाकार असुन, त्यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी शेकडो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरच्या दिशेने प्रस्थान करतात.
श्री क्षेत्र घोराड ही संतभुमी म्हणुन प्रसिद्ध असुन येथे श्री संत केजाजी महाराज आणि त्यांचे सुपुत्र श्री संत नामदेव महाराज असे दोन महान संत होऊन गेले. हे दोन्ही संत विठ्ठल भक्त होते आणि दरवर्षी आषाढी व कार्तिकी पायदळ वारी करीत असत. त्यांच्या काळापासुनच घोराड-पंढरपुर पायदळ वारीची परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते.
यवतमाळ येथील ह.भ.प. नरेश महाराज यांनी श्री क्षेत्र घोराड येथुन आळंदीपर्यंत जाऊन संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होत पायदळ पंढरपुर वारीची परंपरा पुढे नेली असून ती आजही अखंडपणे सुरू आहे.
यंदाच्या आषाढी वारीसाठी घोराड येथुन आणखी दोन दि.५जुलैला आळंदी व तेथुन पायदळ पंढरपुर व दि.१२ जुलै ला घोराढ ते पंढरपुर दिंड्याही पंढरपुरकडे रवाना होणार असल्याने संपुर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या निनादात श्री संत केजाजी महाराज की जय, श्री संत नामदेव महाराज की जय च्या जयघोषात वारकऱ्यांनी पंढरीच्या दिशेने प्रस्थान केल्याने घोराड नगरी भक्तिरसाने न्हाऊन निघाली आहे.परीसरातील अनेक भाविकांनी निघालेल्या दिंडी सोहळा ‘*याची देही,याची डोळा*’ बघण्याचा व दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती, दिंडी सोहळा सेलु शहरात दाखल होताच गुजर परीवार व ग्रामस्थांनी कुमकुम टिलक तसेच प्रत्येक भाविकांचे पदस्पर्श दर्शन घेऊन आशिर्वाद घेतला,हा सोहळा पुढील वाटचाल करीत असताना ठिक ठिकाणी स्वागत तसेच चहा, नाश्ता,व फलाहार चे वितरण भाविक भक्तां कडुन करण्यात आले होते,हा दिंडी सोहळा सेलु,कान्हापुर मार्गे पवणार येथे नंदिखेडा येथे दुपारी विश्रांती घेणार असुन तेथुन दुपारी वर्धा शहरातील प्रमुख मार्गावरून निघुन रात्री चमत्कारिक हनुमान मंदिर सावंगी मेघे येथे मुक्कामी असणार आहे.रविवार दि.२८जुन ला सकाळी देवळी,शिरपुर कळंब,मडकोना, यवतमाळ,आर्णी,खडका, हिंगोली, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ,पाथरी, भगवान बार्शी,वडशिंगी,शेटफळ मार्ग दि.२३जुलै ला श्री क्षेत्र पंढरपुर ला दाखल होणार आहे, तिथे श्री संत केजाजी महाराज मठ,शाखा पंढरपुर (शेगांव धुमाला) येथे मुक्कामी असणार आहे. गुरुपौर्णिमा नंतर वारी परतीच्या प्रवासाला निघणार आहे.या वारकरी सोहळ्यात सकाळी अल्पोपहार, जेवण, औषधी वाटप या साठी भाविकांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग नोंदवला आहे.तसेच अनेक भाविकांनी सढळ हस्ते सहकार्य केले असल्याचे दिंडी चालक हरिदास महाकाळकर व धनराज झाडे यांनी शिवशाही न्युज नेटवर्क शी बोलताना सांगितले.

