शिवशाही न्युज नेटवर्क
आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित मल्लखांब प्रात्यक्षिकादरम्यान गंभीर जखमी झालेल्या १३ वर्षीय भुमिका भगत हिची अखेर मृत्युशी सुरू असलेली प्रदीर्घ झुंज संपली. तिच्या निधनाने संपुर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असुन सर्वत्र शोककळा पसरली आहे.
१३ एप्रिल रोजी आयोजित मल्लखांब प्रात्यक्षिकादरम्यान भुमिका भगत खाली पडुन गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू होते. अनेक दिवस मृत्युशी संघर्ष केल्यानंतर अखेर तिची प्राणज्योत मालवली. मोठी स्वप्ने उराशी बाळगणारी ही चिमुरडी कायमची काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
भुमिका भगत यांच्या निधनाची माहिती मिळताच खासदार अमर काळे यांनी आपला दौरा अर्धवट सोडुन थेट त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. त्यांनी शोकाकुल कुटुंबीयांची भेट घेऊन आई, भाऊ व इतर नातेवाईकांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी दिवंगत भुमिकाला भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करत कुटुंबीयांना धीर दिला.
“भुमिकाचे जाणे ही अत्यंत वेदनादायी घटना असुन या दुःखद प्रसंगी आम्ही संपुर्ण कुटुंबाच्या पाठीशी आहोत. ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो,” अशा शब्दांत खासदार अमर काळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
भुमिका भगत यांच्या अकाली निधनामुळे संपुर्ण परिसरातुन शोक व्यक्त करण्यात येत असुन अनेक नागरिक, सामाजिक संघटना व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तिला भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

