शहर प्रतिनिधी
सेलु (वर्धा):
सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत येत असलेल्या शहरी आयुष्यमान आरोग्य मंदिर, वडगाव रोड, सेलु येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या राबविण्यात आली. ५ वर्षांखालील बालकांना पोलिओचे डोस देऊन या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या डॉक्टर ऋतुजा गारघाटे आणि परिचारिका कांचन श्रीनाथे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांनी उपस्थित पालकांना पोलिओ लसीकरणाचे महत्त्व पटवुन दिले आणि एकही बालक या मोहिमेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली.
यावेळी अंगणवाडी सेविका प्रमिला महाजन, आशा वर्कर कल्पना सुर्यवंशी आणि वंदना डगवार यांनी गावातील प्रत्येक बालकापर्यंत लसीकरणाचा लाभ पोहोचवण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
मोहिमेदरम्यान जनआरोग्य समितीच्या सदस्या व नगरसेविका मनीषा भलावी आणि समितीचे सदस्य सागर राऊत प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले व परिसरातील नागरिकांना आपल्या बालकांना पोलिओ डोस नक्की पाजण्याचे आवाहन केले. या मोहिमेला स्थानिक नागरिकांचा व पालकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.


