विशेष प्रतिनिधी
चंद्रपुर :
सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्यचे जिल्हाध्यक्ष लोकेन्द्र एल. ठाकुर यांना काही अज्ञात व्यक्तींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी त्यांनी चंद्रपुरचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार सादर करून कारवाईची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, २३ जुन रोजी कार्यालयातुन घरी जात असताना दोन व्यक्तींनी त्यांना अडवुन धमकी दिली. संघटनेच्या माध्यमातुन विविध शासकीय विभागांतील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविल्यामुळे काही अधिकारी आणि संबंधित व्यक्तींकडुन दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
तक्रारीत या संपुर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून धमकी देणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, योग्य कारवाई न झाल्यास येत्या १० ऑगस्टपासुन कर्मचारी वर्गासह उपोषणाला बसण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे विभागातील कर्मचारी वर्गात खळबळ उडाली असुन, संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

