पत्नीच्या बदलीचा पदभार स्विकारण्यासाठी निघालेले कुटुंब काळाच्या पडद्याआड
अमरावती, प्रतिनिधी : समृद्धी महामार्गावर रविवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात चंद्रपुरच्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यु झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे चंद्रपूरसह संपुर्ण विदर्भात शोककळा पसरली आहे.
चंद्रपुरच्या बाबुपेठ येथील रहिवासी भास्कर महादेव जीवने हे डब्ल्यूसीएलमध्ये वर्कशॉप प्रमुख म्हणुन कार्यरत होते. त्यांच्या पत्नी आरती जीवने या शासकीय सेवेत असुन त्यांची नुकतीच अकोला येथे एकात्मिक बाल विकास अधिकारी म्हणुन बदली झाली होती. पत्नीला नवीन पदावर रुजु करण्यासाठी जीवने कुटुंब कारने (एमएच-३४ बीएफ-१३४६) अकोल्याकडे निघाले होते.
धामणगाव रेल्वे परिसरातील समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक १०५ जवळ एक कंटेनर ट्रक (एनएल-०१ एके-७१२३) नादुरुस्त झाल्याने रस्त्याच्या कडेला उभा होता. याचवेळी भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट ट्रकच्या मागील भागावर जाऊन धडकली.
अपघात एवढा भीषण होता की कारचा पुढील भाग पुर्णपणे चक्काचूर झाला आणि कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यु झाला.
महादेव जिवाजी जीवने (६५)
लताबाई महादेव जीवने (६०)
भास्कर महादेव जीवने (४३)
आरती भास्कर जीवने (४१)
जीज्ञा भास्कर जीवने (१२) यांचा मृतक व्यक्तींमध्ये समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच दत्तापुर पोलीस, महामार्ग पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढुन पुढील कार्यवाही करण्यात आली.
एकाच घरातील तीन पिढ्यांतील पाच सदस्यांचा एका क्षणात झालेला अंत चंद्रपुरकरांच्या जिव्हारी लागला असुन बाबुपेठ परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

