विशेष प्रतिनिधी
सातारा
सातारा शहरात घडलेल्या एका धक्कादायक खुन प्रकरणाचा अवघ्या ४८ तासांत उलगडा करण्यात डी.बी. पोलिस पथकाला यश आले आहे. केतन (वय २३) याच्या हत्येमागे त्याचाच मित्र चेतन शिंदे आणि होणाऱ्या पत्नीचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणामुळे सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत केतन आणि त्याची होणारी पत्नी यांच्यात काही कारणांमुळे वाद सुरू होते. त्याच दरम्यान संबंधित तरुणी आणि चेतन शिंदे यांच्यात जवळीक निर्माण झाली. दोघांनी मिळुन केतनचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला.
घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. संशयितांची कसुन चौकशी केल्यानंतर संपुर्ण कट उघडकीस आला. पोलिसांनी आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
या हत्येमागील कारण वैयक्तिक वाद आणि प्रेमसंबंधातील गुंतागुंत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. शहरातील या थरारक प्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
* अवघ्या ४८ तासांत पोलिसांनी केला खुनाचा उलगडा*
* • सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशनमुळे आरोपी जेरबंद•
* होणाऱ्या पत्नीचा कटात सहभाग उघड•
* मित्रानेच मित्राचा घेतला जीव; साताऱ्यात खळबळ

