डॉ.सुधिर अग्रवाल
वर्धा
भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सणामागे जीवनमुल्ये, निसर्गसंवर्धन आणि कौटुंबिक ऐक्याचा संदेश दडलेला असतो. ज्येष्ठ पौर्णिमेला साजरी होणारी वटपौर्णिमा ही त्याचे उत्तम उदाहरण आहे. सती सावित्रीने आपल्या बुद्धी, चातुर्य आणि निष्ठेच्या बळावर यमराजाकडुन पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले, त्या घटनेच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो.
वटपौर्णिमा ही केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठी केलेली पुजा नसुन, संकटात धैर्य, विवेक आणि संवादकौशल्याने मार्ग काढण्याचा संदेश देणारा सण आहे. सावित्रीचे व्यक्तिमत्त्व आजच्या स्त्रीसाठी प्रेरणादायी आहे. संकटांशी बुद्धीने सामना करणारी प्रत्येक स्त्री ही आधुनिक सावित्रीच आहे.
वटवृक्षाच्या पुजेमागे वैज्ञानिक आधारही आहे. वडाचे झाड पर्यावरण शुद्ध ठेवण्यास मदत करते. वडाभोवती प्रदक्षिणा घालण्यामागे आरोग्य, सकारात्मक ऊर्जा आणि निसर्गाशी नाते दृढ करण्याचा संदेश आहे. तसेच १०८ या संख्येलाही धार्मिक आणि खगोलशास्त्रीय महत्त्व आहे.
मात्र आज या सणाचे स्वरूप बदलत चालले आहे. सोशल मीडियावरील दिखावा, महागड्या वस्तुची स्पर्धा आणि बाह्य प्रदर्शनामुळे सणाचा मुळ हेतू मागे पडत आहे. वर्षभर नात्यांमध्ये तणाव असताना केवळ समाजाला दाखवण्यासाठी साजरा होणारा सण नात्यांतील दांभिकतेचे प्रतीक बनत आहे.
याहुन चिंताजनक बाब म्हणजे काही गुन्हेगारी घटनांमध्ये पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करणाऱ्या महिलाच पतीच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या घटना समोर येत आहेत. एका बाजुला यमराजाशी लढणारी सावित्री आणि दुसऱ्या बाजुला बदलत्या नैतिक मुल्यांमुळे नात्यांचा ऱ्हास करणाऱ्या विकृत प्रवृत्ती, हा समाजासाठी चिंतनाचा विषय आहे.
वडाच्या फांद्या तोडुन पुजा करण्याऐवजी वडाचे रोप लावुन त्याचे संवर्धन करणे, कठोर निर्जला उपवासाऐवजी आरोग्याची काळजी घेणे, सोशल मीडियावरील दिखाव्यापेक्षा परस्परांतील प्रेम, विश्वास आणि सन्मानाला प्राधान्य देणे, हीच आजच्या काळाची गरज आहे.
पतीला ‘परमेश्वर’ नव्हे तर ‘सहचारी’ मानुन परस्पर आदर, विश्वास आणि कृतज्ञतेची नाती जपणे, हाच वटपौर्णिमेचा खरा संदेश आहे. निसर्गाचे रक्षण, नात्यांतील पारदर्शकता आणि कौटुंबिक ऐक्य जपले, तरच वटपौर्णिमा खऱ्या अर्थाने श्रद्धा, विज्ञान आणि कुटुंबाचा त्रिवेणी संगम ठरेल.

