घोराड/सेलू प्रतिनिधी : यावर्षी पावसाळा कमी राहणार असल्याची चर्चा सुरू असतानाच सोमवारी सायंकाळी निसर्गाने अचानक रौद्ररूप धारण केले. हवामान विभागाने पुढील सहा दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर सायंकाळी सुमारे सहा वाजताच्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
दणकेबाज पावसासोबत जोरदार वाऱ्याने आणि विजांच्या प्रचंड कडकडाटाने नागरिकांची अक्षरशः धांदल उडाली. अनेक ठिकाणी विजेचा आगडोंब उसळल्याने आणि त्याचवेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सुमारे दीड तास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. मात्र, विजांचा कडकडाट इतका भीषण होता की नागरिकांच्या कानठळ्या बसल्या तर लहान मुले घाबरून रडु लागली. अनेक चिमुकली आईच्या कुशीत डोके ठेवुन “आई, आज काय होणार?” असा प्रश्न विचारत होती, तर महिला वर्गाने घराचे दरवाजे बंद करून देवाचा धावा करत संकट टळावे, अशी प्रार्थना केली. सायंकाळी मजुर वर्ग व शेतकरी आपले जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधुन घरी पोहोचले असतानाच पावसाचे आगमन झाल्याने कोठेही मोठी दुर्घटना किंवा जिवितहानी झाली नाही.
दमदार पावसामुळे शेतातुन मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर निघुन लेंडी नाला आणि बोर नदीला यंदाचा पहिला पुर आला. नदी-नाल्यांमध्ये पाणी आल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसुन आले असुन पिकांसाठी हा पाऊस वरदान ठरणार असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
मुसळधार पावसामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी दीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या या दमदार पावसाने शेतकरी वर्ग मात्र सुखावल्याचे चित्र पाहायला मिळाले.

