दरवर्षी घडतात बुडुन मृत्युच्या घटना; तरीही सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव, नागरिकांचा संताप अनावर.
सेलु प्रतिनिधी
सेलु तालुक्यातील रिधोरा येथील पंचधारा धरणाने पुन्हा दोन निष्पाप जीवांचा बळी घेतला आहे. मंगळवारी दुपारी वर्धा येथील दोन युवकांचा धरणात बुडुन मृत्यु झाल्याने संपुर्ण परिसरात शोककळा पसरली असून प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा येथील ओम वरठी (वय 38, सावजी नगर), राकेश अंडरसकर (वय 34, आदिवासी कॉलनी), प्रवीण हिवसे (गजानन नगर) आणि चंदू मेश्राम (सावजी नगर) हे चौघे मित्र मंगळवारी फिरण्यासाठी रिधोरा येथील पंचधारा धरण परिसरात आले होते. परिसरात आल्यानंतर त्यांनी धरणात पोहण्यासाठी प्रवेश केला. यावेळी चौघेही युवक नशेत असल्याची चर्चा परिसरात सुरू होती.
धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने ओम वरठी आणि राकेश हे दोघे खोल पाण्यात अडकले व बुडु लागले. त्यांनी मदतीसाठी आर्त हाका मारल्या. त्यानंतर प्रवीण हिवसे आणि चंदू मेश्राम यांनी रिधोरा गावाकडे धाव घेऊन नागरिकांना माहिती दिली. मात्र, ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचेपर्यंत काळाने दोघांवर झडप घातली होती.
घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढुन पंचनामा करण्यात आला. घटनेची माहिती मृतांच्या कुटुंबीयांना देण्यात आली असुन या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
*प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आणखी किती बळी*?
पंचधारा धरण परिसरात यापुर्वीही अनेक बुडुन मृत्युच्या घटना घडल्या आहेत. तरीही येथे कोणतेही इशारा फलक, सुरक्षारक्षक, प्रतिबंधात्मक उपाययोजना किंवा पोहण्यास बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. प्रत्येक दुर्घटनेनंतर काही दिवस चर्चा होते आणि नंतर सर्व काही जैसे थे होते.
पंचधारा धरण नेमके पर्यटनस्थळ आहे की मृत्युचा सापळा, असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत. आणखी किती युवकांचे बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांकडुन उपस्थित केला जात आहे.

