अनेक गावांचा संपर्क तुटला; शेकडो शेतकऱ्यांचा शेतांशी संपर्क खंडित, नव्याने बांधलेल्या पुलाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
विशेष प्रतिनिधी
देवळी
देवळी तालुक्यात झालेल्या हंगामातील पहिल्याच मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले असुन अनेक ठिकाणी पुल, रपटे आणि पांदण रस्ते वाहुन गेल्याने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जामणी–पडेगाव मार्गावरील पुल पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याने या मार्गावरील वाहतुक पुर्णपणे बंद झाली आहे. तसेच मुरगाव खोसे परिसरातील पांदण रस्त्यावरील नाल्याचा पुलही कोसळल्याने सुमारे १०० हुन अधिक शेतकऱ्यांचा शेतांशी संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणी पायी जाणेही धोकादायक बनले आहे.
दरम्यान, देवळी–डिगडोह मार्गावरील यशोदा नदीवरील सुमारे ५ कोटी ५४ लाख रुपये खर्चुन नुकताच बांधण्यात आलेल्या पुलाच्या दोन्ही बाजुचा रस्ता ६ ते ८ इंचांपर्यंत खचल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे पुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असुन स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दिर्घी–बोपापुर मार्गासह अनेक ठिकाणी पांदण रस्ते आणि रपटे वाहुन गेल्याने शेतकऱ्यांना शेतीपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. पावसामुळे शेतीची कामेही ठप्प झाली असुन ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा फटका बसला आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त पुल व रस्त्यांची दुरुस्ती करून वाहतुक सुरळीत करावी तसेच निकृष्ट दर्जाच्या बांधकामांची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

