सेलु : सेलु-हिंगणी मार्गावरील घोराड येथे सेवालाल महाराज मंदिरासमोर भरधाव तीनचाकी ऑटोचा समोरील टायर अचानक फुटल्याने अपघात झाला. या अपघातात हिंगणी येथील सौ. सुरेखा संजय अवचट (वय ४४) या गंभीर जखमी झाल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, सेलुहुन हिंगणीकडे जाणारा ऑटो (क्र. MH-31-CV-7369) भरधाव वेगाने जात असताना समोरील टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटुन ऑटो रस्त्यावर पलटी झाला. अपघातावेळी सौ. सुरेखा अवचट या ऑटोखाली दबल्या गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
घटना घडताच परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत त्यांना ऑटोखालुन सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर दुसऱ्या ऑटोच्या मदतीने त्यांना सेलु येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांच्या कमरेला गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आल्याने पुढील उपचारासाठी त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले.
या अपघातामुळे काही काळ परिसरात वाहतुक विस्कळीत झाली होती. नागरिकांच्या तत्परतेमुळे जखमी महिलेला तातडीने उपचार मिळु शकले.

