कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदीच्या उपशाखेत ‘सहकार परिषद’ उत्साहात संपन्न; बदलत्या सहकार क्षेत्रावर मान्यवरांचे मार्गदर्शन.
सेलु (विशेष प्रतिनिधी):
बदलत्या काळात शेतकऱ्यांची जीवनवाहिनी असलेल्या सहकार क्षेत्राला अधिक मजबुत करणे गरजेचे आहे, हाच सुर आज सेलुत उमटला. निमित्त होते, कृषी उत्पन्न बाजार समिती सिंधीच्या सेलु उपशाखेमध्ये आयोजित दिमाखदार ‘सहकार परिषदेचे’.
बुधवार, १ जुलै रोजी पार पडलेल्या या परिषदेत सहकार क्षेत्रातील आमुलाग्र बदलांवर मंथन तर झालेच, पण सोबतीला समाजोपयोगी उपक्रम आणि एका नेतृत्वाचा वाढदिवस साजरा झाल्याने या सोहळ्याला एका कौटुंबिक उत्सवाचे स्वरूप आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे दुरदृष्टी लाभलेले सभापती श्री. केशरीचंद खंगारे होते, तर मुख्य अतिथी म्हणुन तालुक्याचे सहाय्यक निबंधक श्री. सतीश गावीत यांची प्रमुख उपस्थिती होती.
बदलत्या सहकाराचे ‘डिजिटल’ व धोरणात्मक मंथन
कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्साहात झाली. सभापती श्री. खंगारे यांनी सहाय्यक निबंधक श्री. गावीत यांचे शॉल व श्रीफळ देऊन स्वागत केले. परिषदेमध्ये मुख्य वक्त्यांनी सहकार विभागात तंत्रज्ञानामुळे होत असलेल्या आधुनिक बदलांची आणि पारदर्शकतेची माहिती उपस्थितांना दिली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना सभापती केशरीचंद खंगारे भावुक झाले, ते म्हणाले,
”सहकार विभाग, पणन आणि बाजार समिती या एकाच रथाची चाके आहेत. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम देणे आणि बाजार घटकांमध्ये विश्वास निर्माण करणे, हीच आपली घटनात्मक जबाबदारी आहे.”
स्वच्छतेचा संकल्प आणि ‘दुग्धशर्करा योग’
केवळ भाषणांपुरती मर्यादित न राहता, या परिषदेने एक सामाजिक आदर्शही घालुन दिला. ‘सहकार सप्ताहा’चे औचित्य साधुन सेलु उपशाखा परिसरात ‘विशेष साफसफाई मोहिमेचा’ शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमाचा आनंद तेव्हा द्विगुणित झाला, जेव्हा सर्वांचे लाडके सभापती श्री. केशरीचंद खंगारे यांचा वाढदिवस असल्याचा दुग्धशर्करा योग उपस्थितांसमोर आला. या प्रसंगी सहाय्यक निबंधक श्री. सतीश गावीत यांनी सभापतींना शॉल-श्रीफळ देऊन प्रशासनाच्या वतीने दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. व्यापाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी केलेल्या या सत्काराने सभापती भारावुन गेले होते.
बाजार घटकांची अथांग उपस्थिती
या सोहळ्याला बाजार समितीचे उपसभापती प्रमोद आदमने, तसेच समितीचे खंबीर खांदे मानले जाणारे सदस्य सर्वश्री गुणवंतराव कडु, काशिनाथ लोणकर, मनोज तामगाडगे आणि सतीश धोपटे प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय परिसरातील शेकडो व्यापारी, अडते आणि बाजार घटकांनी हजेरी लावुन या परिषदेची शोभा वाढवली.
नियोजनाची ‘मास्टरी’
कोणताही मोठा कार्यक्रम यशस्वी होतो तो पडद्यामागील कलाकारांमुळे. या संपुर्ण सोहळ्याचे अत्यंत शिस्तबद्ध आणि नेटके नियोजन बाजार समितीचे सचिव तथा मुख्य अधिकारी श्री. महेंद्र भांडारकर यांनी केले होते. त्यांना वरिष्ठ कर्मचारी श्री. बंडु अंबागडे आणि तरुण सहकारी केतन मुटे यांच्यासह संपुर्ण कर्मचारी वृंदाने मोलाची साथ दिली. सेलु उपशाखेतील ही सहकार परिषद केवळ शासकीय औपचारिकता न ठरता, एक यशस्वी आणि दिशादर्शक सोहळा ठरली.

