लोखंडी रॉडने बेदम मारहाणीत ४८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यु; दोन आरोपी अटकेत
विशेष प्रतिनिधी
पुलगाव : प्रेमसंबंधाच्या संशयातून ४८ वर्षीय व्यक्तीवर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आपटी (वाघोली) परिसरात घडली. नागसेन भगत (वय ४८, रा. आपटी, ता. देवळी, जि. वर्धा) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी पुलगाव पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागसेन भगत हे आपल्या मुलाला पुलगाव येथील शाळेत सोडून आपटीकडे परत जात होते. दरम्यान, पुलगाव-दहेगाव धांदे मार्गावरील एकलासपुर येथील मारुती मंदिराजवळ दबा धरून बसलेल्या अविनाश जनार्दन कोल्हे आणि गिरीश पद्माकर कोल्हे (दोघेही रा. आपटी) यांनी त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी लोखंडी रॉडने नागसेन यांना जबर मारहाण केली.
या हल्ल्यात नागसेन भगत गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यु झाला. या घटनेने आपटीसह परिसरात खळबळ उडाली.
संशयातून हल्ला?
प्राथमिक तपासानुसार, नागसेन भगत यांचे आरोपींच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. मात्र, या प्रकरणातील नेमके कारण आणि हत्येपुर्वीच्या घटनाक्रमाचा पोलीस सखोल तपास करीत आहेत.
मृतकाची पत्नी सोनाली नागसेन भगत यांच्या तक्रारीवरून पुलगाव पोलिसांनी BNS कलम १०३(१), ११५(२) व ११८(१) अन्वये गुन्हा दाखल केला असुन अविनाश कोल्हे व गिरीश कोल्हे या दोघांना अटक करण्यात आली आहे.
वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मदनकर व पुलगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.

