फटाक्यांची आतिषबाजी अन् तरुणाईचा उत्साह; विसर्जन मिरवणुकीने श्री क्षेत्र घोराड दुमदुमले
अनुज वरटकर
विशेष प्रतिनिधी
घोराड : श्री क्षेत्र घोराड येथील श्री संत केजाजी महाराज मंदिर परिसरात विराजमान झालेल्या ‘घोराडचा राजा’ गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीने गुरुवारी सायंकाळी संपुर्ण घोराड नगरी भक्तिमय झाली.
सायंकाळी ६ वाजता ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीत गावातील तरुणाई मोठ्या उत्साहाने सहभागी झाली होती. **‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’**च्या जयघोषाने परिसर दुमदुमुन गेला.
यावेळी करण्यात आलेली गुलालाची उधळण व फटाक्यांची आकर्षक आतिषबाजी विशेष लक्षवेधी ठरली. गणरायाला निरोप देण्यासाठी गावातील प्रत्येक तरुण उत्साहाने मिरवणुकीत सहभागी झाला होता. भक्तिमय वातावरणात निघालेल्या या मिरवणुकीने घोराडच्या गणेशोत्सवाची सांगता जल्लोषात झाली.



