एकाच खिडकीतुन व्यवहार, पैसे काढण्यासाठी दोन ते तीन तासांचा प्रतीक्षाकाळ
राजेश वरटकर
मुख्य संपादक
सेलु : शहरातील बँक ऑफ इंडिया शाखेच्या भोंगळ कारभारामुळे ग्राहकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः मंगळवारच्या साप्ताहिक बाजाराच्या दिवशी शाखेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, पैसे जमा करणे व काढणे यासाठी ग्राहकांना दोन ते तीन तास रांगेत उभे राहावे लागत आहे.
बँकेतील आर्थिक व्यवहार प्रामुख्याने एका खिडकीतुनच होत असल्याने ग्राहकांचा वेळ वाया जात असुन ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि महिलांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. कर्मचारीवर्गाकडुनही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे.
ही शाखा अत्यंत अडचणीच्या ठिकाणी कार्यरत असुन, वाहनतळाची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे ग्राहकांना वाहने उभी करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. शहरात इतर अनेक सोयीस्कर जागा उपलब्ध असतानाही वर्षानुवर्षे ही शाखा याच ठिकाणी सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
याशिवाय बँकेत पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहाची कोणतीही सुविधा नसल्याने ग्राहकांची मोठी कुचंबणा होत आहे. बँकेत एखादी आकस्मिक घटना घडल्यास ग्राहकांना बाहेर पडणे किंवा आपत्कालीन यंत्रणेला आत पोहोचणेही कठीण असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी असूनही लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडुन करण्यात येत आहे. बँकेचा कारभार सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करणे, व्यवहारासाठी स्वतंत्र खिडक्या सुरू करणे आणि शाखा प्रशस्त ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

