भाजपच्या दोन महिला कार्यकर्त्यांना अटक
विशेष प्रतिनिधी
चंद्रपुर
चंद्रपुरातील नवजात बाळ विक्री प्रकरणात रामनगर पोलिसांनी तपासाचा वेग वाढवत भाजपशी संबंधित दोन महिला कार्यकर्त्यांना अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात यापुर्वीच नवजात बाळाची विक्री, अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि बाळ खरेदी प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सायली येरणे आणि भाग्यश्री हांडे या दोघींना बुधवारी ताब्यात घेत अटक केली.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, नवजात बाळाच्या अवैध व्यवहाराला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी दोघींनी साक्षीदार म्हणुन भुमिका बजावल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर न्यायालयासमोर हजर केले असता दोघींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणामुळे चंद्रपुरच्या राजकीय वातावरणातही चर्चा रंगल्या आहेत. दोन्ही महिला स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्या गटाशी संबंधित कार्यकर्त्या असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच भाग्यश्री हांडे यांनी यापुर्वी महानगरपालिका निवडणुक लढविल्याची माहितीही समोर आली आहे.
या संपुर्ण प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत असुन, आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
टीप: 👆ही बातमी उपलब्ध माहितीवर आधारित आहे. संबंधित आरोपींवरील आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत. तपास सुरू असुन अंतिम निष्कर्ष न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल.

