रुग्णांची गैरसोय वाढली
कर्मचारी दुपारनंतर घरी; गरीब, शेतकरी व कामगारांना फटका
राजेश वरटकर
मुख्य संपादक
सेलु येथील ग्रामीण रुग्णालयात अनेक वर्षांपासुन सकाळ व सायंकाळ अशा दोन सत्रांमध्ये ओपीडी सुरू होती. मात्र, काही दिवसांपासुन सायंकाळची ओपीडी बंद करण्यात आल्याने रुग्णांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे, दुपारनंतर अनेक कर्मचारी रुग्णालयातुन निघुन जात असल्याची नागरिकांची तक्रार असुन, त्यामुळे दुपारनंतर उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना विनाकारण हेलपाटे मारावे लागत आहेत.
दिवसभर शेतात किंवा मजुरीवर काम करणारे नागरिक सायंकाळी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात येत असत. मात्र सायंकाळची ओपीडी बंद झाल्याने त्यांना खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत असुन, आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दुपारीच कर्मचारी घरी जात असल्यामुळे आपत्कालीन नसलेल्या रुग्णांना उपचार मिळत नाहीत. अनेकांना “उद्या सकाळी या” असे सांगुन परत पाठवले जात असल्याचीही तक्रार आहे. त्यामुळे शासनाच्या ग्रामीण आरोग्य सेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तालुक्यातील वाढती लोकसंख्या आणि ग्रामीण भागातील नागरिकांची गरज लक्षात घेता, पूर्वीप्रमाणे सायंकाळची ओपीडी तातडीने सुरू करावी, तसेच रुग्णालयातील उपस्थिती आणि कामकाजाची चौकशी करून निष्काळजी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
आरोग्य विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सेलु ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवा पूर्ववत करण्याची अपेक्षा नागरिकांकडुन व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे जिल्ह्यात ईतर रुग्णालयात दोन वेळ ओपीडी असतांना सेलु येथील ग्रामीण रुग्णालयात सकाळचीच ओपीडी रहात असल्याने येथे नवीन नियम हे स्थानिक अधिकाऱ्यांनी बनवले काय?असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
याबाबत वैद्यकीय अधीक्षक यांनी लक्ष घालुन नागरिकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात यावी.
