पावसावर अवलंबुन रोजगार; अनियमित मजुरीमुळे शेतमजुरांचे जीवन असुरक्षित
राजेश वरटकर
मुख्य संपादक
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या शेतमजुरांचे जीवन आजही संघर्षमय आहे. शेतीतील कामांवर आणि पावसाच्या लहरीवर अवलंबुन असलेल्या या मजुरांच्या हाताला वर्षभर नियमित काम मिळत नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न कायम आहे. मेहनतीचा घाम गाळुनही उद्याच्या घासाची चिंता त्यांच्या पाठीशी लागलेली आहे.
पेरणी, निंदणी, खुरपणी, कापणी अशा हंगामी कामांच्या काळात शेतमजुरांना रोजगार मिळतो. मात्र, पाऊस उशिरा येणे, अतिवृष्टी किंवा पिकांचे नुकसान झाल्यास कामाचा अभाव निर्माण होतो. त्यामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवते. विशेषतः महिला शेतमजुरांनाही नियमित रोजगार मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबाचा गाडा चालविणे कठीण होत आहे.
दिवसभर कष्ट करून मिळणारी मजुरीही वाढत्या महागाईच्या तुलनेत अपुरी पडत आहे. मुलांचे शिक्षण, आरोग्य, घरखर्च आणि दैनंदिन गरजा भागविताना अनेक शेतमजुरांना कर्जाचा आधार घ्यावा लागतो. काम नसलेल्या दिवसांत रोजगाराच्या शोधात अनेकांना शहरांकडे स्थलांतर करावे लागते.
शेतकरी आणि शेतमजुर हे नैसर्गिक संकटांचे पहिले बळी ठरतात. त्यामुळे शेतमजुरांसाठी वर्षभर रोजगार उपलब्ध करून देणे, रोजगार हमी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक सहाय्य वाढविणे आवश्यक असल्याची मागणी ग्रामीण भागातुन होत आहे.
श्रमाचा घाम गाळणाऱ्या शेतमजुरांच्या जीवनात स्थैर्य आणण्यासाठी शासनाने ठोस धोरणे राबविण्याची गरज असल्याचे मत सामाजिक क्षेत्रातुन व्यक्त होत आहे. मेहनतीच्या बळावर देशाची अन्नसुरक्षा टिकवुन ठेवणाऱ्या या घटकाला सन्मानाने जगण्याची संधी मिळावी, हीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
