राजेश वरटकर
मुख्य संपादक
सेलू : आषाढी एकादशीच्या पार्श्वभुमीवर विठ्ठलभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला असुन, सेलू तालुक्यातील दोन वारकऱ्यांनी सायकलवरून पंढरपुर वारीचा संकल्प केला आहे. वाहितपुर (ता. सेलु) येथील जानराव वरघणे (वय ७०) आणि श्रीक्षेत्र घोराड येथील रमेश तेलरांधे (वय ६२) हे दोघे आज दुपारी सायकलस्वारी करत पंढरपुरच्या दिशेने रवाना झाले.
या भक्तिमय प्रवासाचा पहिला मुक्काम कळंब येथील चिंतामणी मंदिरात राहणार असून, दोघेही दररोज सुमारे ५० किलोमीटर अंतर सायकलने पार करणार आहेत. नियोजनानुसार ते २५ जुलै रोजी आषाढी एकादशीला पंढरपुर येथे पोहोचतील.
पंढरपुर येथे विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर गुरुपौर्णिमेनिमित्त होणारा लाही-पोहे प्रसाद घेऊन ते परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. सेलू ते पंढरपुर आणि परतीचा असा मिळुन सुमारे १,४०० किलोमीटरचा हा संपुर्ण प्रवास सायकलवरून पुर्ण करण्याचा त्यांचा निर्धार आहे.
विशेष म्हणजे, सायकलवरून पंढरपुर वारी करण्याची ही परंपरा त्यांनी मागील वर्षापासुन सुरू केली असुन, वाढत्या वयातही अखंड श्रद्धा, जिद्द आणि विठ्ठलभक्तीचा संदेश देणारी त्यांची ही सायकलवारी परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.
