शिवशाही न्युज नेटवर्क
जळगाव
नव्या संसाराची स्वप्ने डोळ्यांत घेऊन सासरी आलेल्या नवविवाहितेवर काळाने अवघ्या सहा दिवसांत घाला घातला. जळगाव शहरातील विद्यापीठासमोरील रस्त्यावर अज्ञात भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत २१ वर्षीय नवविवाहिता वैशाली भाऊसाहेब पाटील (रा. कोळपिंप्री, ता. अमळनेर) हिचा जागीच मृत्यु झाला. या अपघातात तिचे काका प्रवीण सूर्याजी पाटील गंभीर जखमी झाले असुन त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वैशाली हिचा विवाह ७ जुलै रोजी जळगाव येथील पोलीस कर्मचारी विजय काशिनाथ पाटील यांच्याशी मोठ्या थाटामाटात झाला होता. विवाहानंतर देवदर्शन करून दोघेही घरी परतले होते. सोमवारी वैशालीला माहेरी घेऊन जाण्यासाठी तिचे काका जळगावला आले होते. दुपारच्या सुमारास दोघे दुचाकीवरून जात असताना मागुन भरधाव आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, वैशालीच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा घटनास्थळीच मृत्यु झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी काकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
लग्नाचा मंडप अजुन दारात उभा असताना आणि हातावरील मेहंदीचा रंगही फिका झाला नसताना घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली आहे.
