सासवड–जेजुरी मार्गावर भरधाव ट्रकची वारकऱ्यांना धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यु, अनेक जखमी*
शिवशाही न्युज नेटवर्क
पुणे
आषाढी वारीदरम्यान सासवड–जेजुरी मार्गावर झालेल्या भीषण अपघातात भरधाव ट्रक क्र.MH43E4908 वारकऱ्यांच्या दिंडीला धडक दिल्याने तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यु झाला, तर अनेक जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे वारीत शोककळा पसरली असून भाविकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वारकरी टाळ-मृदुंगाच्या गजरात पंढरपुरच्या दिशेने पायी जात असताना भरधाव ट्रकने नियंत्रण गमावून दिंडीत घुसल्याने हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की काही वारकरी ट्रकखाली सापडले. स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
या अपघातात नंदा पवार (वय 60), माधवी सनगरे (वय 55) आणि राजश्री भोसले (वय 55) या तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक जखमींवर उपचार सुरू असुन काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेनंतर प्रशासनाने अपघाताची चौकशी सुरू केली असून ट्रक चालकाविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, वारी मार्गावरील वाहतुक आणि वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
