शिवशाही न्युज नेटवर्क
चंद्रपुर
एमआयडीसी खुटाळा परिसरातुन २१ लाखांहुन अधिक किमतीच्या गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक चोरीला गेल्याच्या धक्कादायक प्रकरणाचा चंद्रपुर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अवघ्या काही दिवसांत छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडुन मोठ्या प्रमाणात सिलिंडर आणि चोरीतुन मिळालेली रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
१२ जुलै रोजी एमआयडीसी खुटाळा येथील गॅस बॉटलिंग प्लांटसमोरील रस्त्यावर उभा असलेला अशोक लेलँड कंपनीचा (क्रमांक MH-34 BG-1600) ट्रक अज्ञात चोरट्यांनी पळवुन नेला होता. ट्रकमध्ये एचपी कंपनीचे घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडर असुन एकुण मुद्देमालाची किंमत सुमारे २१.१४ लाख रुपये होती. याप्रकरणी ट्रान्सपोर्ट व्यावसायिक वैभव विनोद खांडरे यांच्या तक्रारीवरून पडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे राजेंद्र रामचंद्र काळे, कुणाल सुभाष घुरुडे आणि मोहित पोतदार या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली.
आरोपींकडुन ८२ भरलेले घरगुती सिलिंडर, २५० रिकामे सिलिंडर, १० भरलेले व्यावसायिक सिलिंडर तसेच चोरीचे सिलिंडर विकुन मिळालेले २.४७ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. या धडक कारवाईमुळे चंद्रपुर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत असुन व्यापारी वर्गानेही समाधान व्यक्त केले आहे.

