राजेश वरटकर
मुख्य संपादक
मान्सुनच्या सुरुवातीला झालेल्या तुरळक पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी पुर्ण केली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतातील कापुस, सोयाबीनसह अन्य पिके करपु लागली असुन शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
तालुक्यात सरी-वरंबा पद्धतीने लागवड करण्यात आलेल्या कापसाला अपुऱ्या ओलाव्याचा मोठा फटका बसला आहे. जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी झाल्याने कापसाची रोपे कोमेजुन वाढ खुंटली आहे. अनेक ठिकाणी पिकांची अवस्था चिंताजनक असुन पाऊस न झाल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
यंदा सुरुवातीच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली. मात्र पावसातील खंडामुळे काहींना दुबार पेरणीचा खर्चही सहन करावा लागला आहे. यामुळे शेतीचा खर्च वाढला असून आर्थिक संकट अधिक गडद होत आहे.
दरम्यान, पाऊस नसल्याने निंदणी-कोळपणी, खतांचा वापर आदी शेतीची कामेही ठप्प झाली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतमजुरांच्या हातालाही काम मिळत नसल्याने त्यांच्यावरही उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त होत आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवसांत समाधानकारक पावसाचा अंदाज व्यक्त केला असला तरी सध्या शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. वेळेत दमदार पाऊस झाला तरच पिकांना जीवदान मिळेल, अन्यथा यंदाचा खरीप हंगाम संकटात सापडण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

