शिवशाही न्युज नेटवर्क
आषाढी एकादशी अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपल्याने संपुर्ण महाराष्ट्रातुन निघालेल्या संतांच्या पालख्या आता पंढरपुरच्या दिशेने अंतिम टप्प्यात मार्गक्रमण करत आहेत. टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा अखंड जयघोष आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या घोषणांनी वारीचा मार्ग भक्तिमय झाला आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यासह विविध संतांच्या पालख्यांमधील लाखो वारकरी रोज अनेक किलोमीटरची पायपीट करत विठुरायाच्या भेटीसाठी पंढरीकडे निघाले आहेत. वाटेत गावोगावी वारकऱ्यांचे उत्स्फुर्त स्वागत होत असुन अन्नदान, पाणी, वैद्यकीय सेवा आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
पंढरपुरमध्येही प्रशासनाने आषाढी एकादशीच्या पार्श्वभुमीवर व्यापक तयारी सुरू केली आहे. मंदिर परिसर, चंद्रभागा घाट, वाहतुक, सुरक्षा, आरोग्य सेवा आणि स्वच्छता यंत्रणा सज्ज करण्यात आल्या असुन वारकऱ्यांच्या आगमनाला वेग आला आहे.
यंदाही श्रद्धा, समता आणि भक्तीचा संदेश देणारी वारी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवत असुन, लाखो वारकऱ्यांच्या पावलांनी पंढरीची वाट भक्तिरसाने न्हाऊन निघत आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांचा महासागर पंढरपुरात लोटण्याची शक्यता आहे.
विठ्ठलाच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र घोराड येथुन पायदळ वारी करीत २७ जुन रोजी निघालेली दिंडी पंढरपुर पासुन अवघ्या १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या कळंब माळेगांव जिल्हा बिड येथे पोहोचली असुन आज पंढरीच्या दिशेने निघाली आहे.रोज मजल दर मजल करीत भगवान बार्शी,शेटफळ येथील मार्गावरुन मार्गक्रमण करीत दि.२३ जुलै ला पंढरीत दाखल होणार आहे.दि.२५जुलै आषाढी एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेऊन गुरुपौर्णिमा निमित्त होणारा लाहीपोही प्रसाद घेऊन परतीच्या प्रवासाला निघणार आहे.

