

सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा; वर्धा बंदला उस्फुर्त प्रतिसाद, जिल्हाधिकारी गैरहजर असल्याने संताप
राजेश वरटकर
मुख्य संपादक
वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रोठा येथील शेतशिवारात बुधवारी एका शेतातील घरात १२ वर्षीय चिमुकली वर अत्याचार करून दगडाने ठेचुन खुन करण्यात आला होता.यानंतर पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन साठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला होता, गुरुवारी शवविच्छेदन करण्यात आले होते यावेळी संपुर्ण रोठा येथील नागरिक तसेच विविध संघटनांनी संतप्त होत आरोपी ला अटक करण्याची मागणी केली होती, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी विविध पथक तयार करून एका संशयित तरुणांला ताब्यात घेतले असुन त्याला अटक केली. चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी शनिवारी वर्धाकर जनतेच्या वतीने शिवाजी चौकातुन सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला. विविध सामाजिक संघटना, व्यापारी, विद्यार्थी, महिला, युवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले. वर्धा बंदच्या हाकेलाही शहरातील व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
मोर्चेकऱ्यांनी आरोपींला फाशीची शिक्षा द्यावी देण्याची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.यावेळी आक्रोश मोर्चा ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात पोलीसांनी थांबविले असता मोर्चेकरी आक्रमक झाले होते मात्र काही सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी सामंजस्य दाखवुन पिडीतेचा परिवार व शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असता, निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलकांमध्ये तिव्र संताप व्यक्त करण्यात आला. “एवढ्या गंभीर घटनेनंतरही जिल्हाधिकारी गैरहजर राहणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असुन प्रशासनाची असंवेदनशीलता आहे,” अशा भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या.
यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी अनिल गावित यांनी निवेदन स्विकारले . आरोपींवर जलदगती न्यायालयात खटला चालवुन फाशीची शिक्षा द्यावी, पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि अशा घटना पुन्हा घडु नयेत यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली.
मोर्चादरम्यान शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चा शांततेत पार पडला असला तरी नागरिकांच्या घोषणांनी संपुर्ण शहर दणाणुन गेले.
ठळक मुद्दे
चिमुकलीला न्याय मिळावा म्हणुन सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा.
आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची एकमुखी मागणी.
वर्धा बंदला व्यापारी व नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद.
निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी अनुपस्थित; आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
जिल्हा प्रशासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर.
