मेणबत्ती प्रज्वलित करून व्यक्त केला संताप; आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी
राजेश वरटकर
मुख्य संपादक
वर्ध्यातील १२ वर्षीय निष्पाप मुलीवरील अत्याचार व निर्घुण हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ शनिवारी सायंकाळी सेलु शहरातील मेडिकल चौकात संपुर्ण सेलुकरांच्या वतीने मेणबत्ती प्रज्वलित करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा, अर्थात फाशीची शिक्षा देण्याची एकमुखी मागणी करण्यात आली.
शहरातील मेडिकल चौकात आयोजित श्रद्धांजली सभेत युवक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “शोकांतिका” असा फलक लावुन निष्पाप चिमुकलीला श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थितांनी हातात मेणबत्त्या घेऊन मौन पाळत पीडित मुलीच्या आत्म्यास शांती लाभावी, तसेच दुःखद प्रसंगाला सामोरे जाणाऱ्या कुटुंबीयांना धैर्य मिळावे, अशी प्रार्थना केली.
महिलांवरील वाढत्या अत्याचारांविरोधात उपस्थितांनी तिव्र संताप व्यक्त करत आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.यावेळी संजय जयस्वाल ,रोशन राऊत, रोशन शिंदे,गोलु कामीनकर, कृष्णा कावळे, साईनाथ जगताप,पप्पु सावंत, किशोर जाधव, रोशन पवार,अमन लोहकरे, अमोल शिंदे,सुरज मोकडे,वंश नाईक, बेदरकर महाराज यांच्या सह व्यापारी वर्ग,युवक व नागरिकांची मोठी उपस्थिती होती.शहरात शांतता व कायदा-सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या वेळी हवालदार लोकेश पवनकर, हवालदार रामकिसन इप्पर तसेच गृहरक्षक अंगद काळसर्पे यांनी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळली.
श्रद्धांजली कार्यक्रम शांततेत पार पडला. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत निष्पाप चिमुकलीला अश्रुपुर्ण श्रद्धांजली वाहिली आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायदेशीर उपाययोजना करण्याची मागणी शासनाकडे केली.
