राजेश वरटकर
मुख्य संपादक
“पुंडलिक वरदे हरी विठ्ठल… श्री ज्ञानदेव तुकाराम!” हा जयघोष कानावर पडला की डोळ्यांसमोर उभी राहते ती लाखो वारकऱ्यांची भक्तिमय वाट. गळ्यात तुळशीची माळ, हातात टाळ-मृदंग, कपाळावर अबीर-बुक्का आणि मुखी विठ्ठलनाम. वारी म्हणजे केवळ पायी चालण्याचा प्रवास नव्हे; तो अहंकार विसर्जित करून भक्तीच्या महासागरात स्वतःला समर्पित करण्याचा आध्यात्मिक उत्सव आहे.
मात्र आज या पवित्र परंपरेवर डिजिटल युगाची सावली गडद होताना दिसते. टाळ-मृदंगाच्या नादासोबत आता मोबाईल कॅमेऱ्याचा ‘क्लिक’ आणि रील्सच्या संगीताचा गोंगाट अधिक ऐकु येतो. भक्तीचा अनुभव घेण्यापेक्षा तो सोशल मीडियावर दाखवण्याची घाई वाढताना दिसते. वारीचा आत्मा अनुभवण्याऐवजी ती ‘कंटेंट’ बनवण्याची स्पर्धा सुरू झाली आहे.
पुर्वी वारकरी सुख-दुःखाची गाठोडी विठ्ठलाच्या चरणी ठेवण्यासाठी पंढरीची वाट धरायचा. तिथे कुणी मोठा नव्हता, कुणी लहान नव्हता.
सगळेच ‘माऊली’ होते. आज मात्र ‘माझे व्ह्युज’, ‘माझे फॉलोअर्स’ आणि ‘माझे लाईक्स’ हा डिजिटल अहंकार भक्तीवर मात करताना दिसतो.
कपाळावरचा बुक्का हा पुर्वी विठ्ठलाच्या चरणधुळीचे प्रतीक होता. आज तो लावताना नजर देवाकडे नसुन मोबाईलच्या फ्रंट कॅमेऱ्यावर असते. रिंगणातील धुळीचा प्रसाद डोक्यावर घेण्याऐवजी ती धुळ रीलमध्ये कैद करण्याची धडपड अधिक दिसते. हजारो जोडलेले हात आता मोबाईल उंचावुन क्षण टिपण्यात व्यस्त असतात.
सेवा की फक्त दिखावा
वारीचे सर्वात सुंदर रूप म्हणजे निस्वार्थ सेवा. वृद्ध वारकऱ्यांना पाणी देणे, थकलेल्या पायांना मालिश करणे, कोणतीही अपेक्षा न ठेवता मदत करणे,हीच खरी वारीची ओळख होती.
आज काही ठिकाणी सेवा करण्यापुर्वी कॅमेऱ्याचा अँगल ठरवला जातो. सेवा संपल्यानंतर लगेच ती सोशल मीडियावर पोस्ट केली जाते. जे काम अंतःकरणातुन व्हायला हवे, ते प्रसिद्धीच्या अपेक्षेने होऊ लागले, तर त्यामागची सात्त्विकता कमी होते.
” संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम”यांनी वारीची परंपरा ‘मी’पणा संपवण्यासाठी दिली. डिजिटल जग मात्र सतत ‘मी आणि माझे प्रोफाइल’ यालाच महत्त्व देत आहे.
अनुभुतीचा विठ्ठल की स्क्रिनचा पडदा?
काही इंचांच्या मोबाईल स्क्रिनमधुन वारी पाहताना आपण दोन मोठ्या गोष्टी गमावतो ,सहसंवेदना आणि क्षणभंगुरतेचा आनंद.
कॅमेऱ्याची लेन्स एका दृश्यावर फोकस करू शकते; पण उघडे डोळे आणि खुले मन संपुर्ण वातावरणातील चैतन्य अनुभवु शकतात. टाळांचा नाद, मृदंगाची लय, वारकऱ्यांच्या श्वासांची एकतानता आणि विठ्ठलनामाचा स्पंदनशील अनुभव कोणताही कॅमेरा पुर्णपणे टिपु शकत नाही.
भक्तीचा गोंगाट की मौनाचे सामर्थ्य?
सोशल मीडियाचा नियम आहे, जो अधिक चकचकीत दिसेल, त्यालाच अधिक प्रसिद्धी मिळेल. वारीचा नियम मात्र याच्या विरुद्ध आहे. वारी ही अंतर्मुख होण्याची, मौनातुन विठ्ठलाशी संवाद साधण्याची आणि स्वतःला शोधण्याची वाट आहे.
रिल्सच्या संगीतामध्ये रथाच्या चाकांचा आवाज, टाळांचा नाद आणि वारकऱ्यांच्या नामस्मरणाची लय हरवु लागली, तर ती वारी राहणार नाही; तो केवळ एक डिजिटल कार्यक्रम उरेल.
प्रसिद्धी नव्हे, कृतज्ञता
संत तुकाराम महाराज म्हणतात
“तुका म्हणे काही । न मागावे यासी विण ॥”
वारी ही प्रसिद्धी मिळवण्याची जागा नाही; ती विठ्ठलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भुमी आहे.
तंत्रज्ञानाचा उपयोग सुरक्षा, माहिती आणि वारीचे सकारात्मक दर्शन घडवण्यासाठी नक्कीच व्हावा. परंतु वैयक्तिक प्रसिद्धीसाठी वारीच्या पावित्र्याचा वापर होऊ लागला, तर आपल्या सांस्कृतिक परंपरेचा आत्माच धोक्यात येईल.
“चला हो पंढरीला जाऊ,जिवाचा जिवलगा पाहु!”
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल… ज्ञानबा तुकाराम!

