शिवशाही न्युज नेटवर्क
पुलगाव/वर्धा
कारला आयशर ट्रकची मागुन जोरदार धडक; कारमधील चार व ट्रकमधील चालक-वाहक जळुन खाक
समृद्धी महामार्गावर विरुळ परिसरात मध्यरात्री भिषण अपघात होऊन सहा जणांचा होरपळुन मृत्यु झाला. भरधाव आयशर ट्रकने मागुन कारला जोरदार धडक दिली, धडक इतकी जोरदार होती की कार ट्रक च्या खाली येऊन पुर्ण पुणे चेंदामेंदा झाली आणि दोन्ही वाहनांना भीषण आग लागली. या आगीत कारमधील चार प्रवासी तसेच ट्रकमधील चालक व क्लिनर यांचा जागीच जळुन मृत्यु झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. मात्र आग इतकी भीषण होती की वाहनांमधील सहाही जणांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर कारला गॅस कटरने कापुन मृतदेह बाहेर काढण्यात आले.
अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने जळालेली वाहने हटवुन वाहतुक पुर्ववत करण्यात आली.
या भीषण दुर्घटनेचा तपास पुलगाव पोलीस आणि समृद्धी महामार्ग पोलीस संयुक्तपणे करत असुन मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण आणि धडकेची परिस्थिती याबाबत अधिक तपास सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असुन कार मधील मृतक हे वर्धा जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येते.

