” अमेय मल्टी सोल्युशन” कंपनीचे कंत्राट रद्द करून निष्पक्ष चौकशीची मागणी; ७५ टक्के स्थानिकांना रोजगार देण्याचा आग्रह
राजेश वरटकर
मुख्य संपादक
बोर जलाशयातील मत्स्यव्यवसाय कंत्राटातील कथित गैरव्यवहार, स्थानिक मच्छीमारांवर होत असलेला अन्याय आणि रोजगाराच्या प्रश्नावर बहुजन समाज पार्टीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. या संदर्भात सोमवारी (२० जुलै) सेलु येथील विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली, बुधवारी (२२ जुलै) सेलु ते बोरधरण असा भव्य घेराव मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.यावेळी
बसपाचे जिल्हाध्यक्ष अनोमदर्शी भैसारे, डॉ. विद्या राईकवार, वर्धा विधानसभा अध्यक्ष निखिल भगत, बसपा जिल्हा महासचिव किशोर मेंढे, जिल्हा सचिव सुरेश दुधे विधानसभा महासचिव विशाल रंगारी, मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष महादेव बावणे, उपाध्यक्ष राकेश डायरे तसेच बहुजन समाज पार्टी चे कार्यकर्ते व मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. बहुजन समाज पार्टी जिल्हा अध्यक्ष अनोमदर्शी भैसारे यांनी सांगितले की, बोर जलाशय हा हजारो मच्छीमार, कामगार व त्यांच्या कुटुंबांचा उपजीविकेचा आधार आहे. मात्र, ” अमेय मल्टी सोल्युशन” या खासगी कंपनीला देण्यात आलेल्या कंत्राटामुळे स्थानिक मच्छीमारांवर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
बसपाने कंत्राट प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा, स्थानिक मच्छीमार सहकारी संस्थांना डावलल्याचा, अनेक वर्षांपासुन काम करणाऱ्या स्थानिकांचा रोजगार कमी केल्याचा तसेच किमान वेतन कायद्याचे पालन होत नसल्याचा आरोप केला आहे. विरोध करणाऱ्या मच्छीमारांना धमकावले जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
यापूर्वी १ जुन रोजी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते. तसेच १६ जुन रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढुन ७५ टक्के स्थानिकांना रोजगार, निष्पक्ष चौकशी आणि योग्य मजुरीची मागणी करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने ठोस कारवाई न केल्याने आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बसपाने स्पष्ट केले.
आंदोलनादरम्यान ” अमेय मल्टी सोल्युशन” कंपनीचे कंत्राट तात्काळ रद्द करून निष्पक्ष चौकशी करावी, कंत्राटात स्थानिक मच्छीमार सहकारी संस्थांना प्राधान्य द्यावे, नव्या कंत्राटदाराने किमान ७५ टक्के स्थानिक मच्छीमार, कामगार व मजुरांना रोजगार द्यावा, किमान वेतन कायद्यानुसार वाढीव मोबदला द्यावा आणि मच्छीमारांवरील दादागिरी तात्काळ थांबवावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत.
सोमवारी दुपारी १२ वाजता सेलु येथील विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली असुन, २२ जुलै रोजी सकाळी १० वाजता सेलु बसस्थानक येथुन विकास चौक, घोराड चौक, मोही, हिंगणी बाजार चौक मार्गे बोरधरणापर्यंत विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात स्थानिक मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

