घोराडमध्ये महावितरणच्या कारभाराविरोधात संताप; नेहमी ३३ केव्ही लाईनवरील फॉल्टचे कारण सांगितले जाते, मात्र स्थानिक अभियंता संपर्काबाहेर
राजेश वरटकर
मुख्य संपादक
सध्या मुबलक प्रमाणात पाऊस पडला नाही, त्यामुळे वातावरणात उष्णता निर्माण झाली आहे, तर ग्राम पंचायत च्या भोंगळ कारभारामुळे गावात मच्छर साठी फवारणी किंवा फागींग मशीनने धुरळणी न केल्याने डास वाढले आहे,त्यातच पाऊस नसताना, वादळी वारे नसतानाही घोराड परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. दिवस असो किंवा मध्यरात्र, कोणतीही पुर्वसुचना न देता दोन-दोन तास वीजपुरवठा बंद केला जात आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तालुका अभियंता शिरपुरकर यांच्याशी संपर्क साधला असता, “३३ केव्ही लाईनवर फॉल्ट आहे,” असे कारण वारंवार सांगितले जात असल्याचा दावा नागरिकांनी केला. मात्र घोराड येथील संबंधित अभियंता जगनीया यांना फोन केल्यास ते अनेकदा फोन उचलत नसल्याने किंवा नेमकी माहिती देत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, नियमित वीजपुरवठा देण्यात महावितरण अपयशी ठरत असताना, भरमसाठ वीजबिले मात्र वेळेवर पाठवली जातात. बिल भरण्यास उशीर झाल्यास वीज तोडण्याची कारवाई तत्काळ केली जाते, मात्र वारंवार होणाऱ्या वीजखंडितबाबत समाधानकारक उत्तर मिळत नाही.
घोराड परिसरातील नागरिकांनी संबंधित अभियंता बदलण्याची मागणी करत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, “एकीकडे वारंवार वीजपुरवठा खंडित होतो, दुसरीकडे गावात मच्छर प्रतिबंधक फवारणीही होत नाही. मग सामान्य नागरिकांनी नेमके न्याय कुणाकडे मागायचा?”
जर विज पुरवठा अखंडित देणे विज वितरण कंपनी ला शक्य नसेल तर विज पुरवठा पुर्णपणे बंद करून विज बिल परत घ्यावी असा संतप्त सवाल नागरिक करीत आहे.

