दोन वर्षे मोबाईलपासुन पुर्ण दुर राहुन घडवला यशाचा इतिहास; जिल्हा परिषद शाळेपासून राष्ट्रीय गुणवत्तेपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
शिवशाही न्युज नेटवर्क
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खडकी या छोट्याशा गावातील श्रावणी कुदळे हिने NEET-UG 2026 परीक्षेत 720 पैकी तब्बल 710 गुण मिळवत अभूतपूर्व यश संपादन केले आहे. या कामगिरीमुळे ती देशातील मुलींमध्ये प्रथम आली असुन अखिल भारतीय क्रमवारीत (AIR) पाचवा क्रमांक पटकावला आहे. ग्रामीण भागातुन राष्ट्रीय स्तरावर झेप घेणाऱ्या श्रावणीच्या या यशामुळे खडकी गावासह संपुर्ण महाराष्ट्राचा मान उंचावला आहे.
श्रावणीचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. तिचे आई-वडील दोघेही शिक्षक असल्याने घरात शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देणारे वातावरण होते. लहानपणापासुनच अभ्यासाची आवड, शिस्तबद्ध दिनचर्या आणि वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्पष्ट ध्येय यामुळे तिने नियोजनबद्ध तयारी केली.
या यशामागील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे श्रावणीने सलग दोन वर्षे मोबाईल आणि सोशल मीडियापासुन पुर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतला. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप यांसारख्या माध्यमांपासुन दुर राहुन तिने संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केले. त्यामुळे वेळेचा योग्य उपयोग झाला आणि अभ्यासात सातत्य राखता आले, असे श्रावणीने सांगितले.
तिच्या यशामागे अभ्यासाची स्मार्ट पद्धतही तितकीच महत्त्वाची ठरली. नियमित मॉक टेस्ट, प्रश्नपत्रिकांचा सातत्याने सराव, चुकांचे आत्मपरीक्षण, वेळेचे काटेकोर नियोजन आणि कठीण विषयांवर वारंवार मेहनत या सुत्रांमुळे तिने प्रत्येक टप्प्यावर स्वतःला अधिक सक्षम बनवले.
श्रावणीच्या या यशात तिच्या शिक्षक पालकांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी तिच्यावर अभ्यासाचा अनावश्यक ताण न येऊ देता सातत्याने प्रोत्साहन, योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्वास दिला. या पाठबळामुळे ती अंतिम परीक्षेला पुर्ण आत्मविश्वासाने सामोरी गेली.
आज लाखो विद्यार्थी NEET सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना श्रावणी कुदळेची यशोगाथा प्रेरणादायी ठरत आहे. ग्रामीण भागातुन, मर्यादित साधनसामग्रीत आणि कठोर शिस्तीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर यश मिळवता येते, हे तिने सिद्ध करून दाखवले आहे.
श्रावणीच्या या ऐतिहासिक यशानंतर खडकी गावात जल्लोषाचे वातावरण असुन पुणे जिल्ह्यासह राज्यभरातील शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिची ही कामगिरी राज्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा नवा आदर्श ठरत आहे.

