शिवशाही न्युज नेटवर्क
पंढरपुर
आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातुन निघालेल्या विविध संतांच्या पालख्या आणि हजारो दिंड्या गुरुवारी पंढरपुरात दाखल झाल्या. विठू माऊलीच्या दर्शनासाठी लाखो वारकऱ्यांनी पंढरी नगरीत गर्दी केली असुन संपुर्ण पंढरपुर नगरी “ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड जयघोषाने दुमदुमुन गेली आहे.
टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा अखंड घोष, भगव्या पताका आणि अभंगांच्या सुरावटींनी पंढरपुर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे. चंद्रभागा नदीत स्नान करून वारकरी विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहत आहेत. विठ्ठल नामाचा गजर करत वारकरी भक्तिभावाने मंदिराकडे मार्गक्रमण करत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.
वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पंढरपुर शहर सजले असुन शहरातील संपुर्ण रस्ते गजबजुन गेले आहे.
विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि स्थानिक नागरिकांकडुन पिण्याचे पाणी, अन्नदान, वैद्यकीय सेवा आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. प्रशासनानेही सुरक्षा, वाहतुक, आरोग्य आणि स्वच्छतेसाठी विशेष नियोजन केले आहे.
आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा पार पडणार असुन त्यानंतर दिवसभर भाविकांसाठी दर्शन खुले राहणार आहे. विठु माऊलीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेल्या लाखो भाविकांमुळे पंढरपुर नगरीत भक्ती, श्रद्धा आणि समतेचा अनोखा सोहळा अनुभवायला मिळत आहे.सध्या श्री मुख दर्शनासाठी चार तास तर विठु माऊली च्या पदस्पर्श दर्शनासाठी चौवीस तास दर्शन बारी लागली आहे,गोपाळपुर च्या पुढे दर्शन रांग गेली असुन भाविकांना दर्शनाची ओढ लागली आहे.उद्या वाखरी येथील उभे रिंगण होणार असुन संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा तसेच संत तुकाराम महाराज पालखी दिंडी सोहळा पंढरपुरात दाखल होणार आहे.

